मुंबई: आपण कोणतंही अॅप वापरत असून किंवा एखाद्या अकाऊंटला लॉगिन करत असून तर आपल्या नंबरवर OTP येतो. ही ओटीपी सिस्टिम आपल्या खात्याच्या आणि डेटा लिक होऊ नये यासाठी आणली आहे. त्यावरही मात करत आता हॅकर्सनी नवीन युक्ती शोधली आहे. OTP शिवाय हॅकर्स आता तुमच्या खात्यापर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यासाठी पोलिसांनी अलर्ट केलं आहे.
अकाऊंट हॅक करण्यासाठी आता हॅकर्स नवीन गोष्टी वापरत आहेत. या नव्या युक्तांमध्ये आपली एक चूक आपल्यासाठी महागात पडू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहाणं गरजेचं असल्याचं सायबर क्राइम डिपार्टमेंटने सांगितलं आहे. ही घटना आहे मुंबईतली. मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार प्रदीप नावाच्या एका युवकाने ऑनलाइन फूड ऑर्डर करण्यासाठी गुगलवर नंबर शोधला होता.
या तरुणाने ऑनलाइन नंबर शोधून त्यावरून फूड ऑर्डर केलं. त्याने आपल्या ऑर्डरसाठी कॉल केला. त्यावेळी आम्ही पुन्हा कॉल करतो असं सांगून फोन ठेवण्यात आला. नंतर 2 मिनिटांत पुन्हा कॉल आला. त्यांनी तरुणाची ऑर्डर लिहून घेतली आणि पेमेंट कसं करणार विचारलं. त्यावर युवकानं घरी खाणं आलं की पैसे देतो असं म्हटलं.
पलिकडून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीनं कोव्हिडचं कारण देत कॅश ऑन डिलिव्हरी सेवा बंद असल्याचं सांगितलं. त्यानंतर पलिकडच्या व्यक्तीनं एका लिंकद्वारे पेमेंट करण्याचा सल्ला दिला. या युवकानं ती लिंक क्लिक केली आणि पेमेंट केलं. त्या पेमेंट पाठोपाठ त्याच्या खात्यातून 75 हजार रुपये गेल्याचाही मेसेज आला.
हा सगळा प्रकार धक्कादायक होता. युवकाला एक क्षण काहीच समजलं नाही. त्याने तातडीनं पोलिसात तक्रार केली. या तरुणाचं अकाऊंट हॅक झालं होतं. त्याच्या एका चुकीची एवढी मोठी शिक्षा त्याला मिळाली होती. त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.