तुमच्याकडे जर सॅमसंगचा स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचं कारण तुमच्या हातातील स्मार्टफोन सायबर हल्ल्याचा बळी ठरण्याची शक्यता आहे. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम अर्थात सीईआरटी इन (CERT-In) या केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या समितीने हा इशारा दिला आहे. यानुसार सॅमसंगच्या ज्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 12 13 आणि 14 ही चार व्हर्जन आहेत, त्यांचे स्मार्टफोन सायबर हल्ल्यांचे बळी ठरु शकतात.
सीईआरटीने नुकत्याच केलेल्या संशोधनातून सॅमसंगचे काही विशिष्ट मोबाईल हँकिंगचे बळी ठरु शकतात असं म्हटलं आहे. अशा प्रकारचे सायबर हल्ले टाळायचे असतील तर सॅमसंग स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सॉफ्टवेअर तात्काळ अपडेट करुन घ्यावे असा सल्ला सीईआरटीने दिला आहे.
"सॅमसंगच्या स्मार्टफोन्समध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक त्रुटी नोंदवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे सायबर हल्ला करणाऱ्यांना सुरक्षा निर्बंध ओलांडत संवेदनशील माहिती मिळवणं सोपं जाणार आहे. तसंच लक्ष्यित प्रणालीवर अनियंत्रित कोड अंमलात आणणंही शक्य होईल," असं CERT-In ने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
जर सायबर हल्लेखोरांनी तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश केला तर ते तुमच्या सिम पिनचा अॅक्सेस मिळवू शकतात. याशिवाय एआर इमोजीचा सँडबॉक्स डेटा, संवेदनशील माहिती मिळवू शकतात. तसंच सिस्टम वेळ बदलून नॉक्स गार्ड लॉकमध्ये प्रवेश करु शकतात.
सॅमसंग मोबाईलचं अँड्रॉईड व्हर्जन 11, 12, 13 आणि 14 ला सुरक्षेतील या त्रुटींचा जास्त धोका आहे. यामध्ये Galaxy S23 सीरिज, Galaxy Z Flip5, Galaxy Z Fold5 and इतर स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
तुमचा स्मार्टफोन अपडेट करण्यासाठी फोन सेटिंगमध्ये जावं लागेल. यानंतर About device मध्ये जाऊन Software update पर्याय निवडा. नंतर Download and install यावर क्लिक करा.