भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारचा धुमाकूळ, जाणून घ्या सर्वोत्तम 10 SUV आणि MPV गाड्या; बंपर विक्री

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. या सेगमेंटमधील टॉप 10 गाड्यांबद्दल बोलायचं झाल्यास मारुती सुझुकी एर्टिगा पहिल्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या या सेगमेंटमधील टॉप गाड्यांबद्दल....  

शिवराज यादव | Updated: Dec 13, 2023, 07:37 PM IST
भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कारचा धुमाकूळ, जाणून घ्या सर्वोत्तम 10 SUV आणि MPV गाड्या; बंपर विक्री title=

भारतीय बाजारपेठेत 7 सीटर एसयुव्ही आणि एमपीव्ही गाड्यांना नेहमीच मोठी मागणी असते. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात कंपन्या नव्या गाड्या बाजारात आणण्याची शक्यता आहे. पण बाजारात सध्याही अशा अनेक एसयुव्ही आणि एमपीव्ही आहेत ज्यांना ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. अशाच काही 7 सीटर गाड्यांबद्दल जाणून घ्या. 

मारुती सुझुकी एर्टिगाला सर्वाधिक पसंती

मारुती सुझुकीची खिशाला परवडणारी 7 सीटर एमपीव्ही Ertiga ही सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या महिन्यात तब्बल 12,857 लोकांनी ही कार खरेदी केली. एर्टिगाच्या विक्रीत गेल्या महिन्यात 7 टक्क्यांची वार्षिक घट झाली आहे.

महिंद्राचाही धुमाकूळ

7 सीटर कारमध्ये महिंद्रा अँड महिंद्रानेही आपलं स्थान टिकवलं असून, धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबरमधील विक्री पाहिल्यास महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक आणि स्कॉर्पिओ-एन पहिल्या 10 मध्ये दुसऱ्या स्थानावर होते. या दोन 7 सीटर कारच्या एकूण 12,185 युनिट्सची विक्री झाली आहे. महिंद्रा बोलेरो तिसऱ्या स्थानावर होती. 9,333 लोकांनी ही गाडी खरेदी केली असून विक्रीत 17 टक्के वाढ दिसली आहे. यानंतर महिंद्रा XUV700 चा क्रमांक आहे. 7,221 लोकांनी या कारला पसंती दर्शवली आहे. या गाडीच्या विक्रीत 27 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

टोयोटा आणि किया

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 7 सीटर कारच्या यादीत पाचव्या क्रमांकावर टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आणि हाय क्रॉससारख्या एमपीव्ही आहेत. ज्यांची एकूण 6,910 युनिट्सची विक्री झाली आहे. गेल्या महिन्यात Kia केरेन्सच्या 4,620 युनिट्सची विक्री झाली. Kia च्या बजेट एमपीव्हीच्या विक्रीत वार्षिक 27 टक्के घट झाली आहे. मारुती सुझुकी XL6 यादीत 7 व्या क्रमांकावर होती, जी 3,472 लोकांनी खरेदी केली.

टाटा सफारी

टाटा मोटर्सच्या या 7 सीटर एसयुव्हीला गेल्या महिन्यात 2207 ग्राहकांनी खरेदी केली. सफारीच्या फेसलिफ्ट मॉडलेचीही चांगली क्रेझ दिसून आली. या कारच्या विक्रीत नोव्हेंबर महिन्यात 50 टक्के वार्षिक वाढ दिसली. यानंतर एमजी हेक्टरची 2130 युनिट आणि हुंडाई अल्कजारच्या 1913 युनिट्सची विक्री झाली. यावेळी टोयो़टा फॉर्च्यूनर टॉप 10 मध्ये सहभागी होऊ शकली नाही. ही कार 11 व्या नंबरवर राहिली.