नवी दिल्ली : ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी Amazon भारतात आता ई-रिक्शा (e-rickshaw) लॉन्च करणार आहे. ही रिक्शा पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे. कंपनी या ई-रिक्शाचा वापर सामान डिलीव्हरीसाठी करणार आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस (Jeff Bezos) यांनी याबाबत माहिती दिली आहे. बेजोस यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बेजोस काही दिवसांपूर्वी भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात छोट्या व्यवसायासाठी त्यांनी १ अब्ज डॉलर गुंतवणूकीबाबत मुद्दाही मांडला. यापूर्वी कंपनीने भारतात ५ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बेजोस ई-रिक्शा चालवताना दिसतात. या व्हिडिओत त्यांनी, आम्ही इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्शा सुरु करत आहोत. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. पूर्णपणे झिरो कार्बन आहे असं म्हणत ट्विटमध्ये त्यांनी ClimatePledge असा हॅशटॅगही वापरला आहे.
Hey, India. We’re rolling out our new fleet of electric delivery rickshaws. Fully electric. Zero carbon. #ClimatePledge pic.twitter.com/qFXdZOsY4y
— Jeff Bezos (@JeffBezos) January 20, 2020
अमेझॉनने भारतात पुढील ५ वर्षात १० लाख नोकऱ्या देण्याचं लक्ष ठेवलं आहे. भारतात नव्या गुंतवणुकीतून, नव्या कौशल्यवान होतकरुंना शोधण्यात आणि त्यांना सक्षम करण्यास मदत होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, अमेझॉन ग्लोबलचे सीईओ जेफ बेजोस यांनी भारत दौऱ्यावर असताना बॉलिवूड किंग खान शाहरुखचीही भेट घेतली होती. यावेळी बोलताना शाहरुखने तो सर्व पुस्तकं अमेझॉनवर खरेदी करत असल्याचं सांगितलं होतं.