Be Aware Of 8617321715 And 9622262167 Mobile Numbers: पाकिस्तानकडून भारतासंदर्भातील कुरापती सुरुच आहेत. आता पाकिस्तानने भारतामधील लष्करी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लष्करी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑप्रेटिव्सकडून (पीआयओकडून) कॉल आणि व्हॉट्सअप मेसेज केले जात आहेत. या विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये सहभागी होण्यास सांगितलं जात आहे. तसेच या विद्यार्थ्यांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या क्रमांकांवरुन विद्यार्थ्यांना कॉल येत आहेत त्या क्रमांसंदर्भात अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कॉल किंवा मेसेज करणारी व्यक्ती स्वत:ची ओळख करुन देताना आपण शालेय शिक्षक असल्याचं सांगते, असं पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला नवीन क्लास जॉइन करावा असं या व्यक्तीकडून सांगितलं जातं. विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकण्याच्या हेतूने त्यांच्याच ओळखीतील एखाद्या व्यक्तीचं नाव सांगून त्यांच्याकडून तुमचा क्रमांक मिळाल्याचं सांगितलं जातं.
सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या महितीनुसार, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या लोकांकडून विद्यार्थ्यांना 2 मोबाईल क्रमांकावरुन फोन आणि व्हॉट्सअप मेसेज केले जात आहेत. हे लोक स्वत:ला शालेय शिक्षक असल्याचं सांगून विद्यार्थ्यांना नवीन क्लासची माहिती देतात. हा क्लास जॉइन करण्यासाठी त्यांना 'वन टाइम पासवर्ड' म्हणजेच ओटीपी पाठवतात. सध्या जम्मू-काश्मीरपासून उत्तर प्रदेशमधील नोएडामधील लष्करी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना असे कॉल आणि मेसेज येत आहेत.
ज्या 2 क्रमांकावरुन असे कॉल येत आहेत त्यांची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. 8617321715 आणि 9622262167 या 2 क्रमांकावरुन कथित पाकिस्तानी एजण्ट्स भारतातील लष्करी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क साधत आहेत. या दोन्ही क्रमांकावरुन कॉल आल्यास सावध राहावे असं यंत्रणांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे. तुम्हालाही या क्रमांकावरुन फोन किंवा व्हॉट्सअप मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा. त्या मेसेजला किंवा फोनला रिप्लाय करु नका. हे दोन्ही नंबर ब्लॉक करा.
लष्करी शाळांच्या मुख्यध्यापकांनी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे आणि काय करावं काय नाही यासंदर्भातील एक पत्रकच जारी केलं आहे. ओटीपीच्या माध्यमातून ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर या विद्यार्थ्यांकडून संवेदनशील माहिती मागवली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांचे पालक काय काम करतात? शाळेचं वेळापत्रक कसं आहे? शिक्षकांची नावं काय आहेत? यासारखी माहिती या विद्यार्थ्यांना विचारली जाते. अशाप्रकारेच मेसेज आणि कॉल इतर क्रमांकावरुनही येऊ शकतात असं मुख्यध्यापकांनी जारी केलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे.