Toyota Rumion: मोठ्या कुटुंबांसाठी Toyota आणतीये सर्वात स्वस्त 7 सीटर; Ertiga वर आधारित कारची किंमत किती?

Toyota Rumion लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहे. ही कार टोयोटा कंपनीची भारतीय बाजारपेठेतील चौथी एमपीव्ही (Multipurpose Vehicle) असेल. टोयोटाकडून लाँच केली जाणारी ही सर्वात स्वस्त 7-सीटर एमपीव्ही असेल.   

शिवराज यादव | Updated: Jul 28, 2023, 01:49 PM IST
Toyota Rumion: मोठ्या कुटुंबांसाठी Toyota आणतीये सर्वात स्वस्त 7 सीटर; Ertiga वर आधारित कारची किंमत किती? title=

Toyota Rumion: जापानी वाहन निर्माता कंपनी सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) एकत्रितपणे एक नवी कार लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यासह टोयोटा आपल्या गाड्यांच्या यादीत Toyota Rumion च्या रुपात एक नवी एमपीव्ही (Multipurpose Vehicle) बाजारात सादर करणार आहे. ही कार मारुती सुझुकीच्या अर्टिगावर (Ertiga) आधारित असणार आहे. नुकतीच ही कार दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेत लाँच करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, ऑगस्ट महिन्यात ही कार विक्रीसाठी लाँच केली जाण्याची शक्यता आहे. 

कशी असेल नवी Toyota Rumion?

टोयोटाची नवी कार Maruti Ertiga वर आधारित असेल. यामध्ये काही बदल केले जाणार आहेत, जे दोन्ही गाड्यांनी एकमेकांपासून वेगळं करतील. किमान एक्स्टिरियरमध्ये तरी काही बदल पाहायला मिळू शकतात. काही दिवसांपूर्वी आफ्रिकन बाजारपेठेत सादर करण्यात आलेल्या Rumion इनोव्हा प्रमाणेच ट्रॅपेझॉइडल ग्रिल देण्यात आलं आहे, त्याशिवाय त्याला एक नवीन फ्रंट बंपर आणि डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत.

Toyota Rumion भारतीय बाजारपेठेत लाँच झाल्यानंतर टोयोटा कंपनीची भारतीय बाजारपेठेतील चौथी एमपीव्ही (Multipurpose Vehicle) असेल. आतापर्यंत कंपनी इनोव्हा क्रिस्टा, इनोव्हा हायक्रॉस आणि वेलफायरसारख्या मॉडेल्सची विक्री करत होती. कंपनीने ऑक्टोबर 2021 मध्ये या एमपीव्हीला दक्षिण आफ्रिकेतील बाजारपेठेत लाँच केलं होतं. त्याचवेळी कंपनीने नेमप्लेटला भारतातही ट्रेडमार्क केलं होतं. ही टोयोटाची सर्वात स्वस्त एमपीव्ही असेल.

ग्लोबल मार्केटमध्ये ज्या मॉडेलची विक्री होत आहे, त्यामध्ये ब्लॅक इंटिरियर देण्यात आलं आहे. दरम्यान आपल्याकडील अर्टिगामध्ये बीज कलरचं इंटिरियर मिळतं. Rumion मध्येही तसंच केबिन पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. या कारमध्ये 1.5 लीटरच्या क्षमतेचं पेट्रोल इंजिन वापरण्यात येणार आहे, जे 103hp ची पॉवर आणि 137 Nm चा टॉर्क जनरेट करतं. याचं इंजिन 5-स्पीड मॅन्यूअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गेअरबॉक्सशी जोडण्यात आलं आहे. 

टोयोटा या कारचं सीएनजी व्हेरियंटही बाजारपेठेत आणण्याची शक्यता आहे. कारण टोयोटाही आपल्या सीएनजी पोर्टफोलियोवर काम करत आहेत. पण सध्या बाजारात फक्त पेट्रोल कारच आणली जाणार आहे. या कारची किमत किती असेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

टोयोटाने अद्याप या कारच्या लाँचसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सणांमधील सेलमध्ये ही कार बाजारात आणली जाऊ शकते. सुझुकी आणि टोयोटामध्ये करार झाला असून दोन्ही कंपन्या एकमेकांच्या गाड्या आणि तंत्रज्ञान शेअर करत आहेत. यामुळे दोन्ही कंपन्या एकमेकांच्या सर्वोत्तम मॉडेलला सादर कर आहेत. मारुती सुझुकीने नुकतंच इनोव्हा हायक्रॉसवर आधारित मारुती इन्व्हिक्टो ही सर्वात महागडी कार म्हणून लॉन्च केली होती. आता Maruti Ertiga वर आधारित, Toyota आपली सर्वात स्वस्त MPV Rumion लाँच करणार आहे.