2kg Tomato Free On Smartphone Purchase: सध्या देशभरामध्ये टोमॅटोच्या दरांनी (Tomato Rates) एकच खळबळ उडवून दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोच्या दरांनी पेट्रोल-डिझेललाही मागे टाकलं आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोच्या दरांनी प्रति किलो 150 रुपयांचाही टप्पाही ओलांडला आहे. मात्र असं म्हणतात की संकटातही संधी शोधावी. अशीच संधी मध्य प्रदेशमधील एका मोबाईल विक्रेत्याने या टोमॅटो दरवाढीचा अनोख्या पद्धतीने फायदा घेतला आहे. येथील अशोकनगर जिल्ह्याची या मोबाईल विक्रेत्याने मोबाईल फोनच्या खरेदीवर चक्क टोमॅटो फ्री देण्याची ऑफर ग्राहकांना दिली आहे.
मध्य प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये टोमॅटोंचा दर 160 ते 180 रुपयांदरम्यान पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील एका मोबाईल विक्रेत्याने मोबाईलवर 2 किलो टोमॅटो फ्री अशी ऑफर सुरु केली आहे. अशोकनगर येथील स्टेशन रोडवर अभिषेक अग्रवाल यांचं मोबाईलचं शोरुम आहे. कोणत्याही कंपनीचा आणि कितीही किंमतीचा मोबोईल घेणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक खरेदीमागे 2 किलो टोमॅटो मोफत दिले जातील अशी घोषणा अभिषेक अग्रवाल यांनी केली आहे. या अनोख्या ऑफरचा अनेकांनी लाभ घेतला असून लोकांना मोबाईलबरोबर टोमॅटोने भरलेली पिशवी देतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अशोकनगरमधील या व्यापाऱ्याने शहरभर या ऑफरसंदर्भातील बॅनर आणि होर्डिंग लावले आहेत. या ऑफरअंतर्गत अनेकांनी टोमॅटोसाठी या दुकानात जाऊन खरोखरच मोबाईल खरेदी केले आहेत. या व्यापाऱ्याने या ऑफरमुळे आपल्या दुकानातील मोबाईलचा खप वाढल्याची माहितीही प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. अनेकजण मोबाईल खरेदी केल्यानंतर दुकानादाराकडून 2 किलो टोमॅटोची पिशवी घेतना फोटो काढून घेत असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या ऑफरच्या माध्यमातून मोबाईल विक्रेताही मालामाल झाल्याचं पहायला मिळत आहे.
"ही ऑफर लागू केल्यानंतर आमच्याकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. अनेकजण टोमॅटो मोफत मिळाल्याने आम्हाला आनंद झाल्याचं सांगतात. मोबाईलबरोबर लोकांच्या घरी एक किलो टोमॅटो आमच्या माध्यमातून पोहचत असतील तर त्यांच्या खर्चाचा भार तेवढाच हलका होईल असं मला वाटतं. याच हेतून ही ऑफर सुरु करण्यात आली आहे," असं अभिषेक अग्रवाल सांगतात.
टोमॅटोचे दर वाढल्याचा फटका मेकडॉनल्डसारख्या मोठ्या ब्रॅण्डलाही बसला आहे. दर्जेदार टोमॅटो बाजारात उपलब्ध नसल्याने सध्या आमच्या उत्पादनांमध्ये टोमॅटो मिळणार नाहीत असं कंपनीने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे.