युवराजच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये किती तथ्य?

भारतीय संघामधून बाहेर असलेल्या युवराज सिंगनं रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षणाला प्राध्यान दिलं आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 24, 2017, 10:15 PM IST
युवराजच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये किती तथ्य? title=

मुंबई : भारतीय संघामधून बाहेर असलेल्या युवराज सिंगनं रणजी क्रिकेटमध्ये खेळण्यापेक्षा बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमी (एनसीए)मध्ये प्रशिक्षणाला प्राध्यान दिलं आहे. बीसीसीआयमधल्या एका गटाला युवराजचा हा निर्णय पसंद आलेला नाही. बीसीसीआयचे काही सदस्य युवराजच्या एनसीएमधल्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. युवराजला सध्या कोणतीही दुखापत झालेली नाही मग तो रणजी न खेळता एनसीएमध्ये काय करतोय असा प्रश्न बीसीसीआयमधल्या अधिकाऱ्यांना पडला आहे.

निवृत्तीसाठी युवराजचं पाऊल?

युवराज सिंगला यो-यो फिटनेस टेस्टमध्ये पास व्हायचं आहे. याआधी युवराज यो-यो फिटनेस टेस्टमध्ये अयशस्वी झाला होता. युवराजचं हे पाऊल म्हणजे निवृत्तीची तयारी असल्याचंही बोललं जात आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार युवराजला नेहरासारखच घरच्या मैदानात निवृत्ती घ्यायची आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकाच मॅचमध्ये नेहराला संधी देण्यात आली. नेहराचं घरचं मैदान असलेल्या दिल्लीमध्ये नेहरा अखेरचा सामना खेळला. 

मोहालीमध्ये युवराज निवृत्त होणार?

भारत आणि श्रीलंकेमधली दुसरी वनडे मोहालीमध्ये खेळवण्यात येणार आहे. ही मॅच खेळून युवराज सिंग निवृत्ती घेऊ शकतो, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. पण या चर्चांवर युवराज आणि बीसीसीआयकडून अजून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

युवराजला भारतीय टीममध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करायचं आहे. तसंच आयपीएलचा लिलावही जवळ आला आहे, त्यामुळे स्वत:चा फिटनेस सिद्ध करण्यासाठी युवराज एनसीएमध्ये जाऊन यो-यो टेस्ट पास करण्यासाठी आग्रही आहे, असंही बोललं जातंय.

युवराज सिंग पंजाबच्या पाच रणजी मॅचपैकी चार मॅचला अनुपस्थित होता. विदर्भाविरोधात खेळलेल्या एकमेव मॅचमध्ये युवराजनं २० आणि ४२ रन्सची खेळी केली.