मेलबर्न : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बॉलशी छेडछाड केली होती. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं कर्णधार स्टिव्ह स्मिथ उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घातली. स्मिथ आणि वॉर्नर यांचं एक वर्षासाठी तर बॅनक्रॉफ्ट याचं ९ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. आता या प्रकरणानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्मिथनं खळबळजनक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच गोत्यात येण्याची शक्यता आहे.
तुम्हाला खेळण्यासाठी पैसे दिले जात नाहीत, तर जिंकण्यासाठी पैसे दिले जातात, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियामधल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं असल्याचा दावा स्मिथनं केला आहे. नोव्हेंबर २०१६ साली होबार्टमध्ये आमचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव झाला होता. हा आमचा लागोपाठ पाचवा पराभव होता. त्याआधी आम्ही श्रीलंकेमध्येही ३ मॅच गमावल्या होत्या. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे जेम्स सदरलँड आणि पॅट होवार्ड माझ्या खोलीत आले आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया तुम्हाला जिंकण्यासाठी पैसे देतं, खेळण्यासाठी नाही, असं म्हणाल्याचं स्मिथनं सांगितलं.
जेम्स सदरलँड आणि पॅट होवार्ड यांनी ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही परिस्थितीत जिंकायचंच ही संस्कृती आणली. या संस्कृतीमुळेच बॉलशी छेडछाड करण्याचं प्रकरण झाल्याचं वक्तव्य स्टिव्ह स्मिथ यानं केलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मी निराश झालो होतो. आम्ही जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचो. त्यासाठी प्रयत्नही करायचो. आम्ही कधीही हरण्यासाठी मैदानात उतरलो नाही. आम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी चांगली कामगिरी आम्ही करायचो, अशी प्रतिक्रिया स्मिथनं दिली.
बॉल छेडछाड प्रकरणानंतर सदरलँड यांनी राजीनामा दिला होता तर होवार्ड यांचं मागच्या महिन्यात निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान बॉल छेडछाड प्रकरणी कॅमरून बॅनक्रॉफ्ट यानं डेव्हिड वॉर्नरकडे बोट दाखवलं आहे. डेव्हिड वॉर्नरच्या सांगण्यामुळे आपण बॉल कुरतडल्याचं बॅनक्रॉफ्ट म्हणाला आहे.