२०१० ते २०१९, दशकाचा किंग विराटच!

टीम इंडियाने २०१९ या वर्षातली शेवटची मॅच खेळली आहे.

Updated: Dec 23, 2019, 10:47 PM IST
२०१० ते २०१९, दशकाचा किंग विराटच! title=

मुंबई : टीम इंडियाने २०१९ या वर्षातली शेवटची मॅच खेळली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मॅचमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आणि वर्षाचा शेवटही गोड झाला. टीम इंडियाने फक्त या वर्षातलाच नाही तर या दशकातलाही शेवटचा सामना खेळला. २०१० ते २०१९ या दशकात क्रिकेटवर राज्य केलं ते विराट कोहलीने. या दशकात विराटने वनडेमध्ये १० हजारांपेक्षा जास्त रन केले. दशकामध्ये १० हजार रन करणारा विराट हा एकमेव खेळाडू ठरला.

३१ वर्षांच्या विराट कोहलीने २००८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. १२ वर्षांच्या या कारकिर्दीत विराटने २४२ वनडे मॅचमध्ये ५९.८४ च्या सरासरीने ११,६०९ रन केले. यामध्ये ४३ शतकं आणि ५५ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडण्याच्या जवळ विराट पोहोचला आहे.

विराटने २०१० ते २०१९ या दशकात २२७ मॅच खेळल्या. यामध्ये त्याने ६०.७९ च्या सरासरीने ११,१२५ रन केले. या दशकातला त्याचा सर्वाधिक स्कोअर १८३ रन होता. रोहित शर्मा या दशकात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. रोहितने या दशकात १८० मॅचमध्ये ८,२४९ रन केले. म्हणजेच विराट आणि रोहित यांच्यात २,८७६ रनचं अंतर राहिलं.

विराटने २०१० च्या दशकात २२७ वनडेमध्ये ४२ शतकं आणि ५२ अर्धशतकं केली. रोहित शर्मा २८ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच विराट आणि रोहित यांच्यात २८ शतकांचं अंतर आहे. हाशीम आमला (२६), एबी डिव्हिलियर्स (२१), डेव्हिड वॉर्नर (१७) हे विराटच्या मागे राहिले.

विराटने अर्ध्यापेक्षा जास्त शतकं लक्ष्याचा पाठलाग करताना केली. विराटने आव्हानाचा पाठलाग करताना २२ शतकं केली.