मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपल्या उत्तम फलंदाजीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. कोहलीची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडमध्ये आहे. 18 ते 22 जून दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध ड्युक बॉलने हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकतंच आयसीसीने अंतिम सामन्यासाठी बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? या बक्षिसाच्या रकमेपेक्षा किंग विराट कोहलीची आयपीएलमधील सॅलरी ही सर्वात जास्त आहे. ही सॅलरी ऐकून थक्क व्हाल.
किंग कोहली आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन या दोघांनीही आपल्या नेतृत्वात आतापर्यंत एकदाही आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. त्यामुळे दोघांनाही ही एक सुवर्णसंधी असल्याचं सांगितलं जात आहे. या अंतिम सामन्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. किवी संघावर टीम इंडिया भारी पडणार का हे पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे.
क्रिकइंफोने दिलेल्या माहितीनुसार, विजयी संघाला 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख इतकी रक्कम मिळणार आहे. तर उपविजेता संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 5 कोटी 85 लाख रुपये मिळणार आहेत. इतर संघांनाही बक्षिस म्हणून काही रक्कम देणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला 4.50 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडला 3.50 लाख डॉलर म्हणजेच 2 कोटी 56 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत.
बंगळुरू संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला आयपीएलमध्ये फ्रॅन्चायझीकडून 17 करोड रुपये दिले जातात. आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत आहे. बंगळुरू संघाचं नेतृत्व कोहलीकडे आहे. आरसीबी संघाने 7 पैकी 2 सामने गमवले आहेत. तर उर्वरित रिशेड्युल झाले असून ते सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत. यावेळी बंगळुरू संघाची कामगिरी चांगली असल्याने आयपीएलची ट्रॉफी मिळवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसत आहे.