छेड काढणाऱ्याला लग्नाला बोलवतात का? जुना फोटो व्हायरल झाल्याने साक्षी मलिक ट्रोल; गायिकेने दिलं प्रत्युत्तर

Wrestlers Protest : भारतीय कुस्तीगिरांनी जानेवारीपासून दुसऱ्यांदा ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.

आकाश नेटके | Updated: Apr 30, 2023, 05:43 PM IST
छेड काढणाऱ्याला लग्नाला बोलवतात का? जुना फोटो व्हायरल झाल्याने साक्षी मलिक ट्रोल; गायिकेने दिलं प्रत्युत्तर title=
(फोटो सौजन्य -@MrSinha_)

Wrestlers Protest : महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात जंतर-मंतर (Jantar-Mantar) येथे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये साक्षी मलिक (sakshi malik), विनेश फोगट, योगेश्वर दत्त अशा अनेक आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. कुस्तीपटूंनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे ब्रिजभूषण सिंह यांनी आपल्यावरील आरोप फेटाळत राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत असे आव्हानही ब्रिजभूषण सिंह यांनी दिले आहे. 

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच आता कुस्तीपटू साक्षी मलिकच्या लग्नातील एक जुना फोटो व्हायरल होत आहे. 2017 मधल्या या फोटोमध्ये साक्षी मलिकच्या लग्नात ब्रिजभूषण शरण सिंह यांनी हजेरी लावली होती. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडियावर युजर्सनी साक्षी मलिकवर टीका करत तिने ब्रिजभूषण सिंह यांना लग्नात कसे बोलावले, असा प्रश्न विचारला जात आहे. यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.

मिस्टर सिन्हा नावाच्या युजरने साक्षी मलिकच्या लग्नाचा फोटो शेअर करत तिच्यावर टीका केली होती.  2015-16 मध्ये ब्रजभूषण सिंहने छळ केला होता असा आरोप साक्षी मलिकने केला होता. ब्रिजभूषण सिंह 2017 मध्ये त्यांच्या लग्नाला उपस्थित होते. आता माझा प्रश्न असा आहे की ज्याने छळ केला त्याच व्यक्तीला कोणती मुलगी तिच्या लग्नाला बोलवू शकते का? असा सवाल या ट्विटर युजरने केला होता. यावर गायिका चिन्मयी श्रीपदाने रिट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

"होय ती करु शकते! जेव्हा तिचा विनयभंग करणारा अधिकारपदावर असतो तेव्हा तिला कोणताही पर्याय नसतो. स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबात छेडछाड सहन करावी लागली आहे आणि त्यांच्या उपस्थितीचा त्रास सहन करावा लागला आहे. यानंतरही सर्वकाही ठीक आहे असे भासवावे लागले आहे. मला खरोखर आशा आहे की हे सर्व छेडछाड करणारे/बलात्कारी समर्थक पृथ्वीवरून नाहीसे होतील!," असे चिन्मयी श्रीपदाने म्हटले आहे.

WFI

जानेवारीनंतर दुसऱ्यांदा कुस्तीगीरांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. अनेक खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. तर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी कुस्तीपटूंच्या कृतीची निंदा केली होती. 'रस्त्यांवर कुस्तीगीरांचे प्रदर्शन करणे हे अनुशासनहीन आहे आणि त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,' असे पीटी उषा म्हटले होते.

आंदोलनामागे काँग्रेसचा हात - ब्रिजभूषण सिंह

"सुरुवातीपासूनच मी या मागे उद्योजक आणि काँग्रेसचा हात असल्याचे सांगत आहे. मला त्याची चिंता नाही. महिला कुस्तीगिरांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या तरी अद्याप धरणे आंदोलन का सुरु आहे? माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी होती. तो आता दाखल झाला आहे. तरी आंदोलन सुरू? आंदोलन, निषेध वगैरे सगळे काही हे खेळाडूंसाठी चाललेले नाही, हे सर्व षडयंत्र रचणाऱ्यांसाठी चालले आहे, असा आरोप ब्रिजभूषण सिंह यांनी केला आहे.