खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने 'हा' खेळाडू झाला नाराज; कोर्टात जाण्याचा इशारा

यावर्षी हा पुरस्कार मलाच मिळायला हवा होता.

Updated: Sep 20, 2018, 11:57 PM IST
खेलरत्न पुरस्कार न मिळाल्याने 'हा' खेळाडू झाला नाराज; कोर्टात जाण्याचा इशारा title=

नवी दिल्ली: खेलरत्न पुरस्कारासाठी आपल्या नावाचा विचार न झाल्यामुळे नाराज झालेला कुस्तीपटू बजरंग पुनियाने याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. बजरंग पुनियाने गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुल स्पर्धा आणि त्यानंतरच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करुन दाखविली होती. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने खेलरत्न पुरस्कारासाठी बजरंग पुनियाच्या नावाची शिफारस केली होती. 
  
  मात्र, पुरस्कार समितीने विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यामुळे बजरंग पुनिया प्रचंड नाराज झाला आहे. तो यासंदर्भात लवकरच क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांची भेट घेणार आहे. 
  
 या निर्णयामुळे मी प्रचंड निराश झालो आहे. मी उद्या क्रीडामंत्र्यांची भेट घेऊन मला डावलण्यात का आले, हा प्रश्न विचारणार आहे. मला फक्त कारण जाणून घ्यायचे आहे. मी पुरस्कारासाठी पात्र असेन तर तो मलाच मिळायला पाहिजे, असे पुनियाने म्हटले. 
  
  या निर्णयाविरोधात तुम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार का, असा प्रश्न बजरंगला विचारण्यात आला. त्यावेळी त्याने म्हटले की, तो शेवटचा पर्याय असेल. यंदाच्या वर्षी मी या पुरस्कारासाठी पात्र होतो असे मला वाटले होते. त्यामुळेच मी पुरस्कारसाठी शिफारस पाठवली होती. कोणत्याही खेळाडुच्यादृष्टीने पुरस्कारासाठी भीक मागणे योग्य नव्हे. मात्र, त्यांच्यासाठी हा मोठा सन्मान असल्याने त्याकरीता लढणे भाग आहे. त्यातच कुस्तीपटूचे करियर तर खूपच अनिश्चित असते. कोणत्याही क्षणी मैदानात झालेली दुखापत संपूर्ण करिअर कायमचे संपवू शकते. हा माझा वैयक्तिक लढा असून यात मला कुस्ती महासंघाला आणायचे नाही, असेही बजरंग पुनियाने सांगितले.