मुंबई : कोरोना व्हायरसचा वाता प्रादुर्भाव पाहता देशातील असंख्य नागरिक तणावग्रस्त परिस्थितीचा सामना करत आहे. जवळपास संपूर्ण जगभरात जगण्याचा हा संघर्ष सुरु आहे. याच परिस्थितीमध्ये आता काही दिवसांवर येऊन ठेलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता बळावत आहे.
स्पर्धा तोंडावर आलेली असतानाच आणि ऑलिम्पिक पदकासाठी प्रचंड जिद्दीने तयारी करणाऱ्या खेळाडूंसाठी ही काहीशी निराशाजनक बाब असू शकते. पण, आपल्या आयुष्याशिवाय इतर कोणतीही बाब महत्त्वाची नसल्याची प्रतिक्रिया एका खेळाडूने दिली आहे.
'सध्याच्या घडीला मी, ऑलिम्पिकचा विचार करत नाही आहे. किमान आता आपण या व्हायरसपासून कसा बचाव करता येईल याचाच विचार करायला हवं. बरं, याचा अर्थ असा होत नाही की मी प्रशिक्षण घेत नाही आहे. मी दर दिवशी सराव करत आहे, प्रशिक्षण घेत आहे. पण, याचवेळी आपल्या आरोग्याची काळजी घेणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे', असं कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला.
'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्याची परिस्थिती पाहता या क्षणाला ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलणंच फायद्याचं ठरणार आहे असं मत त्याने मांडलं. 'हा निर्णय फक्त माझ्यासाठीच नव्हे, तर इतर सर्वच देशांसाठी फायद्याचा ठरेल. हा काळ सर्वांसाठीच फार कठीण आहे. त्यांनी ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धांचं आयोजन केलं तर इतर राष्ट्रांचा त्यात सहभाग असेल. परिणामी आम्हालाही जावंच लागेल. पण, दोन चार महिने किंवा परिस्थिती सुधारेपर्यंत प्रतीक्षा करणं कधीही योग्य ठरणार आहे. कारण जगलो तरच ऑलिम्पिक खेळू शकू', असं तो म्हणाला.
'जगलोच नाही, तर मग या ऑलिम्पिकचाही काय अर्थ?', असा प्रश्न उपस्थित करत त्याने सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडलं. दरम्यान, कोरोनामुळे मवारी कॅनडाकडून या स्पर्धेतून काढता पाय घेण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. तर, ऑस्ट्रेलियाकडून खेळाडूंना थेट पुढील वर्षासाठी खेळाडूंन तयारी करण्यास सांगण्यात आलं.