शेवटच्या बॉलवर मुंबईला हवे होते 5 रन अन्... WPL च्या पहिल्याच सामन्यातील रोमहर्षक Video पाहाच

Women's Premier League MI vs DC: बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांमध्ये झालेल्या महिला प्रिमिअर लीग स्पर्धेचा पहिलाच सामना फारच रोमहर्षक ठरला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 24, 2024, 08:13 AM IST
शेवटच्या बॉलवर मुंबईला हवे होते 5 रन अन्... WPL च्या पहिल्याच सामन्यातील रोमहर्षक Video पाहाच title=
पहिल्याच सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला

Women's Premier League MI vs DC: महिलांचं इंडियन प्रिमिअर लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वुमन्स प्रिमिअर लीगचा पहिलाच सामना रोमहर्षक ठरला. बेंगळुरुमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांमध्ये हा सामना खेळवण्यात आला. या सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या चेंडूवर लागला. मुंबईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती. मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या एस. संजनाने आपला पहिलाच चेंडू अगदी संयमाने थेट सीमेपार धाडला. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत संजनाने मुंबईला विजय मिळवून दिला. या षटकारासहीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संधाने दिल्लीच्या तोंडचा घास हिरावत वियश्री खेचून आणली.

मुंबईचा शेवटच्या चेंडूवर विजय

दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघाने 172 धावांचं आव्हान मुंबईच्या संघाला देण्यात आलं होतं. मुंबईच्या संघाने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज देत सामना जिंकला. 20 षटकांमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात 173 धावा करत मुंबईने सामना 4 विकेट्स राखून जिंकला. मुंबईकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने 55 धावांची खेळी केली. तर यास्तिका भाटियाने 57 धावांची खेळी केली. एस. संजनाने विजयी षटकार लगावत संघाला जिंकवून दिलं. दिल्लीकडून अरुंधती रेड्डी आणि एलसी कॅप्से या दोघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 

दिल्लीचा उत्तम खेळ

यापूर्वी इंग्लंडची महिला क्रिकेटपटू एलीस कॅप्सेने 75 धावांची खेळी करत संघाला 171 च्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवलं. 5 विकेट्सच्या मोबदल्यात दिल्लीच्या संघाने 170 धावांचा टप्पा ओलांडला. एलीसने 53 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 75 धावांची खेळी केली. सलामीवीर शेफाली वर्मा ही अवघी 1 धाव करुन तंबूत परतली. अनुभवी वेगवान गोलंदाज शबनम इस्लाइलच्या गोलंदाजीवर शेफाली बाद झाल्यानंतर एलीस मैदानात उतरली होती. एलीसने कर्णधार मेग लॅनिंगसहीत 64 धावांची महत्त्वाची पार्टनरशीप केली. मेग लॅनिंगने 31 धावांची खेळी केली.

तो सिक्स व्हायरल

पॉवर प्लेमध्ये दिल्लीची धावसंख्या केवळ 26 इतकी होती. मात्र एलीसच्या खेळीच्या जोरावर त्यांना चांगली धावसंख्या उभारता आली. एलीसने उपकर्णधार जेमिमा रोड्रिग्सबरोबर तिसऱ्या विकेटसाठी 7.3 षटकांमध्ये 73 धावांची पार्टनरशीप केली. जेमिमाने 42 धावांची खेळी केली. जेमिमाचं अर्धशतकं अवघ्या 8 धावांनी हुकलं. मात्र या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात घडलेला थरार सध्या चर्चेत आहे. शेवटच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि युपी वॉरिअर्स या 2 संघांमध्ये खेळवला जाणार आहे.