'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....'

India Squad For World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) वर्ल्डकप (World Cup) संघाची घोषणा करताना पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चांगलाच संतापला. बाहेर काय चर्चा सुरु आहे याच्याशी मला काही देणं घेणं नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.   

Updated: Sep 5, 2023, 07:19 PM IST
'मी असल्या प्रश्नांची उत्तरं देणार नाही,' 'तो' प्रश्न ऐकताच रोहित शर्मा पत्रकारावर संतापला; म्हणाला 'जर तुम्ही भारतात....' title=

India Squad For World Cup 2023: वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली. दरम्यान, यावेळी रोहित शर्माला पत्रकाराने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळताना लोक काय विचार करतात यावर त्याचा दृष्टीकोन काय आहे? अशी विचारणा केली. मात्र या प्रश्नावर रोहित शर्मा चांगलाच संतापला. तसंच जेव्हा भारतात वर्ल्डकपदरम्यान पत्रकार परिषदा होतील तेव्हा अशा प्रश्नांची उत्तरं देणार नाही असंही स्पष्ट केलं. 

"मी याआधी अनेकवेळा सांगितलं आहे. बाहेर काय होत आहे याच्याशी मला काही देणंघेणं नाही. संघात खेळणारे सर्वजण प्रोफेशनल खेळाडू आहेत. असे प्रश्न मला विचारु नका. मी अशा प्रश्नांची उत्तरं देणार नाही. अशा गोष्टींबद्दल बोलण्याला खरंच काही अर्थ नाही. आम्ही दुसऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत असून, अशा गोष्टींची चिंता करत नाही," असं रोहित शर्माने यावेळी सांगितलं.

'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'

 

भारताने वर्ल्डकप संघ घोषित करताना जवळपास आशिया कपसाठी निवड केलेला संघच कायम ठेवला आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. रोहित शर्माने आमच्या अपेक्षेप्रमाणे संघ निवडण्यात आला असून, फार बदल केले नसल्याचं सांगितलं आहे. "संघात कोणताही आश्चर्याचा धक्का नसून, तुम्ही फक्त 15 जणांनाच संधी देऊ शकता. काही खेळाडू नाराज होतील. मीदेखील यातून गेलो आहे आणि संघात स्थान न मिळाल्यानंतर कसं वाटतं याची जाणीव आहे. आमच्याकडे अष्टपैलू खेळाडूंचे चांगले पर्याय आहेत. हे सर्वोत्तम 15 खेळाडू आहेत," असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

"मी अद्याप योजनांबद्दल विचार केलेला नाही. चांगले खेळाडू भरपूर प्रमाणात असणे ही एक चांगली समस्या आहे. कोण फॉर्ममध्ये आहे आणि आम्ही कोणाविरोधात खेळणार आहोत हे आम्हाला पाहावे लागेल. सर्वोत्तम संघ कोणता असू शकतो हे आम्हाला पाहावे लागेल. जर कोणाला वगळण्यात आलं असेल तर मग काही करु शकत नाही. हे होतच राहते. तुम्हाला संघासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतात," असं रोहित शर्माने सांगितलं आहे.

रोहित शर्माने यावेळी गोलंदाज निवडताना ते फलंदाजीतही मदत करु शकतील असा विचार करण्यात आल्याची माहिती दिली. रोहित शर्मा म्हणाला की, जगातील सर्व चांगल्या संघांकडे असे गोलंदाज आहेत जे थोडीफार फलंदाजी करू शकतात आणि हातभार लावू शकतात. 

"तुम्हाला फलंदाजीत एक चांगला संघ तयार करावा लागतो. फलंदाजीचा विचार करता 8 आणि 9 वा क्रमांकही महत्त्वाचा असतो. आम्ही तिथे थोडे कमी पडतो. त्यांचं काम फक्त गोलंदाजीचं नाही तर काही धावा कऱणंही आहे. 10 ते 15 धावाही तुमच्या विजय,पराभवात मोलाच्या असतात," असं रोहित शर्माने सांगितलं.

पुढे त्याने सांगितलं की, "तुम्हाला परिस्थिती काय आहे ते पहावे लागेल. सहा गोलंदाज प्रत्येकी 10 षटके टाकू शकत नाहीत. त्या दिवशी कोणत्या गोलंदाजाला अनुकूल स्थिती आहे हे पाहावे लागेल. अशी वेळ येईल जेव्हा फिरकी गोलंदाज पूर्ण 20 षटकं टाकू शकणार नाहीत".

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज