अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जिथं बलाढ्य संघ आणि त्यांच्याहून काहीसे कमकुवत संघ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: Oct 28, 2023, 09:47 AM IST
अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण title=
World Cup Pakistan can still reach the semi finals with this equation see how the mathematics of the points table is

World Cup 2023 Points Table : एकिकडे वर्ल्ड कप जिंकणं हेच अंतिम लक्ष्य ठेवत इतर देशांचे संघ कमाल कामगिरी करत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानचा संघ मात्र क्रिकेटप्रेमींची घोर निराशा करतानाच दिसत आहे. शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. जिथं संघाच्या फलंदाजीची फळी सपशेल अपयशी ठरली. विजयी क्षण समोर दिसत असतानाच काही चुकांमुळं संघाला अपयशाचा सामना करावा लागला आणि पुन्हा एकदा पाकच्या संघावर क्रिकेटप्रेमींनी सडकून टीका केली. 

सलग चौथ्या पराभवानंतर आता संघाकडून नेमक्या काय अपेक्षा ठेवाव्यात असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडत आहे. इतकंच नव्हे, तर आता संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे की नाही, संघ यासाठी पात्र आहे की नाही असेच प्रश्न अनेकांना पडत आहेत. तुम्हालाही असेच प्रश्न पडतायत का? मग समजून घ्या आतापर्यंतच्या Points Table चं गणित. 

हेसुद्धा वाचा : बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की

 

वर्ल्ड कप 2023 मध्ये पाकिस्ताननं आतापर्यंत 6 सामने खेळले असून, सुरुवातीच्या 2 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळाला होता. तर, त्यानंतरचे 4 सामने मात्र पराभव पाहावा लागला. त्यामुळं पॉईंट्सटेबलमध्ये संघ समाधानकारक स्थानावर नाही हे नक्की. सध्या संघाच्या खात्यात 4 गुण आहेत, तर -0.387 नेट रन रेटच्या बळावर संघाला सहावं स्थान मिळालं आहे. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही संघाचा पराभव झाल्यामुळं इथंही हाती निराशाच लागली. वास्त्विक या पराभवानं स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाची नामुष्की झाली असाच अनेकांचा समज झाला. पण, इथंच खरी गंमत आहे. कारण अद्यापही पाकचा संघ स्पर्धेतून बाद झालेला नाही. कारण, संघाकडे अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. 

उर्वरित तीन सामन्यांमध्ये बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील संघाला मोठ्या फरकानं विजय मिळवणं गरजेचं आहे. इतकंच नव्हे, तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या दोन्ही सामन्यांच्या निकालावरही पाकिस्तानचं भविष्य अवलंबून आहे. थोडक्यात पाकिस्तान शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असली तरीही संघानं आशा बाळगण्यास काहीच हरकत नाही.