मुंबई : २०१९ क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. यंदाचा क्रिकेट वर्ल्ड कप हा १२वा आहे. त्यानिमित्ताने याआधीच्या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या काही रंजक किस्स्यांवर आपण एक नजर टाकणार आहोत. वर्ल्ड कप १९९२ चे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये करण्यात आले होते. या वर्ल्ड कप स्पर्धेत गमतीदार तसेच अवाक करणारे अनेक प्रसंग पाहायला मिळाले. तसेच अनेकदा डोक्यावरुन जाणाऱ्या डकवर्थ लुईस नियमाचा वापर देखील करण्यात आला होता. त्यामुळे ही वर्ल्डकप स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली होती.
भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला क्रिकेट खेळता येत नसलं तरी त्याला क्रिकेट मात्र कळतं. याच क्रिकेट रसिकांना क्रिकेटमधला डकवर्थ लुईसचा नियम डोक्यावरून जातो. १९९२ च्या वर्ल्ड कपमध्येही डकवर्थ लुईसचा रंजक किस्सा घडला होता. २२ मार्च १९९२ ला दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळवण्यात आली होती. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
इंग्लडने ४५ ओव्हरमध्ये २५२ रन केल्या. यामुळे आफ्रिकेला विजयासाठी २५३ रनचे विजयी आव्हान मिळाले. मॅच शेवटच्या टप्प्यात पोहचली होती. फायनलमध्ये धडक मारण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला १३ बॉलमध्ये २२ रनची गरज होती. पण त्यावेळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे मॅचचा काही वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर काही वेळेने खेळ परत सुरु झाला.
पावसाच्या व्यत्यामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी १३ बॉलमध्ये २२ रन हवे होते. पण जेव्हा पावसाच्या व्यत्ययानंतर परत सुरु झाला तेव्हा आफ्रिकेला विजयासाठी नवा आकडा देण्यात आला. हा आकडा डकवर्थ लुईस नियमानुसार देण्यात आला. आफ्रिकेला तब्बल १ बॉलमध्ये २२ रनचे आव्हान मिळाले, त्यामुळे डकवर्थ नियमानुसार आफ्रिकेचा १९ रन्सने पराभव झाला.
वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान मॅचची वाट प्रत्येक क्रिकेटप्रेमी आवर्जुन बघतो. दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये मॅचदरम्यान हमरीतुमरीही होते. असाच एक किस्सा १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये पाहायला मिळाला. पाकिस्तानचा जावेद मियादाद बॅटिंग करत होता. तेंडुलकर बॉलिंग करत होता. कीपर म्हणून किरण मोरे होते. त्यावेळी मोरे-मियादाद यांच्यात मैदानात हमरीतुमरी पाहायला मिळाली.
यानंतर पुढच्या बॉलवर मियादाद चोरटी रन घेण्यास प्रयत्न करत होता. पण त्याला मागे परतावे लागले. यावेळेस कीपर किरण मोरे यांनी स्टंपवरच्या बेल्स उडवल्या. किरण मोरे यांना डिवचण्यासाठी मियादादने बेडका सारख्या उड्या मारल्या. हा सर्व प्रकार पाहून मैदानात हशा पिकला. जेव्हा जेव्हा वर्ल्डकप बद्दल बोलले जाते, तेव्हा तेव्हा मोरे-मियादाद प्रकरणाचा विषय आवर्जून काढला जातो.
जगातला सर्वोत्तम फिल्डर म्हणून आजही दक्षिण आफ्रिकेच्या जॉन्टी ऱ्होड्सचं नाव घेतलं जातं. त्याला हे वलय खऱ्या अर्थाने १९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये एका रन आऊटमुळे प्राप्त झालं. जॉन्टी ऱ्होड्सने इंझमाम उल हक याला रनआऊट केले होते. हा साधासुधा रनआऊट नव्हता, तर ऱ्होडसने स्ट्राईक एंडच्या स्टंपच्या दिशेने उडी घेत इंजमामला रन केलं. ऱ्होड्स यांच्या त्या रनआऊटची चर्चा आजही केली जाते.