World Cup 2019 : भारताचे ७ शिलेदार पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार

२०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

Updated: Jun 4, 2019, 07:03 PM IST
World Cup 2019 : भारताचे ७ शिलेदार पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार title=

साऊथम्पटन : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आपला पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. ५ जूनला म्हणजेच बुधवारी साऊथम्पटनच्या एजेस बाऊल स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या १५ पैकी ७ खेळाडूंचा हा पहिलाच वर्ल्ड कप आहे.

लोकेश राहुल

लोकेश राहुलने २०१८ सालच्या इंग्लंड दौऱ्यात पहिल्या दोन टी-२०मध्ये दोन शतकं आणि अखेरच्या टेस्टमध्येही एक शतक झळकावलं. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खराब कामगिरीमुळे त्याला टेस्ट टीममधून वगळण्यात आलं. त्यानंतर तीन वनडे राहुल खेळला. मात्र एका खाजगी कार्यक्रमात महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला मायदेशी पाठवण्यात आलं. यानंतर भारतातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यानं पुनरागमन केलं आणि दोन्ही टी-२०मध्ये त्यानं शानदार कामगिरी केली. आयपीएलमध्येही पंजाबकडून खेळताना त्यानं साऱ्यांची वाहवा मिळवली.

विजय शंकर

विजय शंकरचा टीम इंडियातील प्रवेशच खूप वाईट होता. निधास ट्रॉफीमध्ये विजय शंकरची कामगिरी निराशाजनक झाली. निर्णायक क्षणी टिच्चून बॅटिंग करण्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. मात्र त्यानंतर एका वर्षानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून धाडण्यात आलं. ऑस्ट्रेलियामध्ये मिळालेल्या संधीचं मात्र त्यानं सोनं केलं. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही आघाड्यांवर तो उपयुक्त ठरु शकतो, त्यामुळे रायुडूऐवजी विजय शंकरची टीममध्ये वर्णी लागली.

केदार जाधव

केदार जाधवला टीम इंडियात संधी मिळाली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काही नाही. मधल्या फळीत तो अतिशय उत्तम बॅटिंग करतो. याखेरीच त्याच्या पार्ट टाईम स्पिन बॉलिंगचाही प्रतिस्पर्धी टीमच्या धोकादायक पार्टनरशीप तोडण्यासाठी फायदा होतो. खेळपट्टी जर कोरडी असेल तर तो भारताला नक्कीच आपल्या फिरकीनं यश मिळवून देऊ शकेल. 

हार्दिक पांड्या 

महिलांबाबतच्या आक्षेपार्ह विधानामुळे अडचणीत आलेल्या हार्दिक पांड्याने जशी आपल्यावरील बंदी उठली तसं शानदार कमबॅक केलं. न्यूझीलंड दौऱ्यावर त्यानं आपल्या कामगिरीनं प्रभावित केलं. त्याच्य तंदुरुस्तीबाबत निवड समितीला थोडी चिंता होती. मात्र आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना त्याला तंदुरुस्तीचा कोणताही त्रास झाला नाही. आपण तंदुरुस्त असून वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचं त्यानं आपल्या या खेळीतून दाखवलं. 

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहलचा वर्ल्ड कपसाठी टीममध्ये समावेश केला नसता तर अधिक आश्चर्य व्यक्त केलं गेलं असतं. दोन वर्षांपासून चहलने केलेली कामगिरी बघता त्याची निवड निश्चित होती. चहलमुळेच टीम इंडियाने मनगटी स्पिनरवर लक्ष केंद्रीत केलं. 

कुलदीप यादव

चायनामन म्हणून ओळख असलेल्या कुलदीप यादवने २०१४मध्ये टीम इंडियात पदार्पण केलं. २०१७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक टेस्टमध्ये त्याने प्रभावशाली कामगिरी केली. आर. अश्विन आणि रवींद्र जाडेच्या जोडगोळीचा प्रभाव आता कमी झाल्यामुळे चहल-कुलदीप या फिरकीच्या जोडगोळीवर आता विश्वास दाखवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ५-१नं विजय मिळवून देण्यात या जोडीचं महत्त्वाचं योगदान होतं. 

जसप्रीत बुमराह

भारतीय बॉलिंगचं सर्वाधिक ताकदवान अस्त्र म्हणजे जसप्रीत बुमराह. त्याच्या समावेशाशिवाय या वर्ल्ड कपसाठीची टीम इंडिया परिपूर्णच होऊ शकली नसती. माजी क्रिकेटपटू जॉन राईट यांनी बुमराहमधील गुणवत्ता सर्वात प्रथम हेरली. दोन वर्षांपूर्वी मुंबईसाठी गुणवान खेळाडूंची शोध घेत असताना जॉन राईट यांना हा हिरा गवसला आणि मग भारतालाही एक गुणवान फास्ट बॉलर लाभला. सध्या बुमराह वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. जुन्या आणि नव्या दोन्ही प्रकारच्या बॉलने तो प्रतिस्पर्ध्यांना मोठमोठे धक्के देऊ शकतो. 

टीम इंडियाचे हे नवखे ७ शिलेदार आपल्या कामगिरीची वर्ल्ड कपमध्ये छाप सोडण्यासाठी आतूर झाले आहेत.