वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह

World Cup 2023: एशिया कप स्पर्धा संपल्यानंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे

राजीव कासले | Updated: Sep 14, 2023, 05:02 PM IST
वर्ल्ड कप स्पर्धेआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, मॅचविनर खेळाडूच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह title=

World Cup 2023 News: भारतात येत्या 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (ICC WC 2023) सुरुवात होणार आहे. 8 ऑक्टोबरला टीम इंडिया आपला सामना बलाढय ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेत यंदा टीम इंडियाला (Team India) जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण टीम इंडियाचं मिशन वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. 

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
एशिया कप स्पर्धेत टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारलीय. टीम इंडियाने नेपाळनंतर सुपर-4 लढतीत पाकिस्तान आणि श्रीलंकेला लोळवलं. विश्वचषक स्पर्धेआधी टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे. पण संघाचा मॅचविनर खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने टीम इंडियासमोर अडचण निर्माण झाली आहे. टीम इंडियातला मधल्या फळीतला आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतग्रस्त झालाय. त्याच्या कमरेला दुखापत झाल्याने शुक्रवाी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दुखापतीतून सावरत मोठ्या कालवाधीनंतर श्रेयस अय्यरने टीम इंडियात पुनरागमन केलं.

एशिया कप स्पर्धेच्या साखळीत नेपाळ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरचा टीम इंडियात समावेश होता. पण त्यानंतर दुखापतीमुळे सुपर-4 सामन्याआधी ऐन मोक्याच्या क्षणी श्रेयस अय्यर बाहेर पडला. त्यातच ऑस्ट्रलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी याच आठवड्यात भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरच्या कमरेला दुखापत झाली आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना त्याच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. श्रेयस अय्यरची दुखापत वेळेत ठिक झाली नाही तर विश्वचषक स्पर्धेतून त्याला बाहेर पडालं लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी नुकतीच संघाची घोषणा केली होती. यात पाचव्या क्रमांसाठी श्रेयस अय्यरला पसंती देण्यात आली आहे. पण आता त्याच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरच्या खेळण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर खेळू शकला नाही तर विश्वचषकापूर्वी दोन सराव सामने आहेत, त्यामुळे दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला पुरेसा अवधी आहे. ही दुखापत फारशी गंभीर नसल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात  श्रेयस अय्यर खेळू शकला नाही तर सूर्यकुमार यादवला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. 

वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहममद शमी, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर