World Cup 2023 South Africa Challenge India: आयसीसी वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये यजमान भारतीय संघाबरोबरच उत्तम कामगिरी करणारा संघ म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा संघ. वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने 7 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने 6 सामने जिंकले असून ते पॉइण्ट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. भारतीय संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला असून दक्षिण आफ्रिकन संघ अद्याप सेमीफायनसाठी पात्र ठरलेलं नाही. हे दोन्ही संघ 5 नोव्हेंबर रोजी आमने-सामने येणार आहेत. असं असतानाच आता दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला थेट चॅलेंज दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज रासी वैन डेर डुसेनने भारतीय संघाला चॅलेंज दिलं आहे.
बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाचा 190 धावांनी पराभव केला. या विजयासहीत दक्षिण आफ्रिकेने पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. मात्र त्यानंतर 24 तासांमध्ये भारताने पुन्हा श्रीलंकेविरुद्धचा सामना 302 धावांनी जिंकून पॉइण्ट्स टेबलमध्ये पहिलं स्थान मिळवलं. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला पराभूत करत त्यांच्या विजयाची मालिका खंडित केली. आता दक्षिण आफ्रिकेसमोर भारताचं आव्हान असणार आहे. पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉपवर असणाऱ्या या संघांचा सामना रविवारी कोलकात्यामधील ईडन गार्ड्नसच्या मैदानावर होणार आहे. भारतीय संघ आतापर्यंतच्या वर्ल्ड कप 2023 च्या एकाही सामन्यात पराभूत झालेला नसतानाही रासी वैन डेर डुसेनने भारताला आव्हान दिलं आहे.
"भारताविरुद्ध भारतामध्ये खेळणं ही फार मोठी गोष्ट आहे. ते फार चांगला खेळ करत आहेत. त्यांच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. ते सर्वच बाबतीत उत्तम आहेत. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीही अव्वल दर्जाची आहे," असं रासी वैन डेर डुसेनने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना म्हटलं. भारताला आम्ही भारतात पराभूत केलं आहे हे सांगायलाही दक्षिण आफ्रिकेचा हा फलंदाज विसरला नाही. "भारतीय संघ उत्तम असला तरी तेव्हा आम्ही मैदानात उतरु आणि आम्हाला हवा तसा खेळ करु तेव्हा आमची सामन्यावर अधिक घट्ट पकड असेल. प्रचंड तणावाखाली खेळणं आणि त्याच परिस्थितीमध्ये सामन्यात वावरणं हे खरं आव्हान असणार आहे. मात्र आम्ही यासाठी तयार आहोत. आम्ही यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध या मैदानात खेळलो आहोत आणि त्यांना पराभूत केलं आहे," असं रासी वैन डेर डुसेनने म्हटलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसीच्या मोठ्या इव्हेंट्समध्ये ऐनवेळी कच खाण्यासाठी 'चोकर्स' म्हणून ओखळला जातो. सध्याच्या वर्ल्ड कप ते सर्वोत्तम कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची फलंदाजी आणि गोलंदाजीही उत्तम आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेमधील सर्वात मोठ्या धावसंख्येपैकी 3 सांघिक धावसंख्या दक्षिण आफ्रिकेनेच केल्या आहेत. "आतापर्यंतच्या स्पर्धेमध्ये आम्हाला नेमकं मैदानात काय करायचं आहे हे आम्हाला ठाऊक आहे आणि ते आम्हाला करता येत आहे ही सर्वात सकारात्मक बाब आहे," असंही रासी वैन डेर डुसेनने म्हटलं आहे.
"सामन्यानंतरच्या आमच्या रिव्ह्यूच्या मिटींग्समध्ये आम्ही आकडेवारीबद्दल आमच्या प्रशिक्षकांबरोबर चर्चा करतो. स्पर्धेतील आकडेवारीबद्दल चर्चा करतो तेव्हा आतापर्यंत आमची कामगिरी समाधानकारक दिसून येतो. त्यामुळे दिवसाच्या शेवटी तुमच्या पुढे कोण आहे हे आम्हाला फार महत्त्वाचं वाटत नाही. आम्ही आमच्या नियोजित प्लॅनप्रमाणे खेळलो, आम्हाला मैदानात जे साध्य करायंच आहे ते करत गेलो आणि तणावामध्येही योग्य पर्याय निवडत खेळत राहिलो तर निकाल हा बायप्रोडक्ट ठरतो," असं रासी वैन डेर डुसेनने म्हटलं आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी निर्धाव चेंडू खेळलेला आणि सर्वाधिक चौकार, षटकार लगावणारा संघ अशी दक्षिण आफ्रिकेची ओळख आहे. यासंदर्भात बोलताना रासी वैन डेर डुसेनने, "आम्ही मैदानात असतानाच आम्हाला जे करायचं असतं त्यासाठी जे प्रयत्न करतो त्याचाच हा परिणाम आहे. आम्ही परिस्थितीनुसार खेळण्याबद्दल चर्चा करतो. ठराविक परिस्थितीत ठराविक निकालासाठी योग्य पर्याय काय असेल हे आम्ही ठरवतो आणि त्यानुसार खेळतो," असं म्हणाला. "संपूर्ण खेळीमध्ये आमचा दृष्टीकोन परिणामकारक ठरतो. आम्ही ठरल्याप्रमाणे खेळलो तर नैसर्गिकरित्या आम्ही सामन्यामध्ये विरोधकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत असतो. मग ही स्थिती धावा करण्यासंदर्भात असो किंवा गोलंदाजीसंदर्भात असो," असं रासी वैन डेर डुसेनने स्पष्ट केलं.