World Cup 2023 First Time In 48 Years: कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 मधील आपला सातवा सामना जिंकत अपराजित राहणारा एकमेव संघ ही ओळख गुरुवारीही कायम ठेवली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांबरोबरच गोलंदाजींनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना तब्बल 302 धावांच्या फरकाने जिंकला. या सामन्यामध्ये अनेक विक्रम नोंदवण्यात आले. मात्र एक विक्रम तब्बल 48 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडला आहे आणि तो ही सामन्यातील दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर.
वर्ल्ड कप 2023 च्या 33 व्या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवला. आधी भारतीय फलंदाजींनी श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. विराट कोहील, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरची शतकं हुकली तरी भारताने श्रीलंकेसमोर 357 धावांचा डोंगर उभा केला. भारतीय सलामीवीर शुभमन गिलने 92 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. विराट कोहलीचं 49 वं शतक केवळ 12 धावांनी हुकलं. कोहलीने 94 बॉलमध्ये 88 धावा केल्या. त्याने 11 चौकार लगावला. विराट आणि शुभमनने 189 धावांची खेळी केली. यानंतर श्रेयस अय्यरने 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. रविंद्र जडेजानेही 24 बॉलमध्ये 35 धावा करत डावाच्या शेवटी धावगती वाढवण्याचा प्रयत्न करत मोठी धावसंख्या उभारली
त्यानंतर गोलंदाजीमध्ये मोहम्मद शामी, मोम्मद सिराज, जसप्रीत बुमराहच्या भन्नाट गोलंदाजांच्या जोरावर श्रीलंकेला केवळ 55 धावांवर बाद केलं. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शमीने 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने 1 विकेट घेतली, सिराजने 3 विकेट्स घेतल्या तर रविंद्र जडेजालाही एक विकेट मिळाली. या सामन्यामध्ये श्रीलंकन संघ फलंदाजीसाठी आल्यानंतर दुसऱ्या डावातील पहिल्याच बॉलवर जसप्रीत बुमराहने विकेट घेतली. यापूर्वी वर्ल्ड कपमधील भारतीय सामन्यामध्ये अशाप्रकारे पहिल्याच चेंडूवर विरोधी संघातील फलंदाजाला बाद करण्याचा प्रकार कधीच घडला नव्हता.
358 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकन संघाला पहिला धक्का बुमराहने पहिल्याच चेंडूवर दिला. पाथम निशंका सामन्यातील पहिलाच बॉल खेळून काढण्याच्या प्रयत्नात असताना बुमराहने टाकलेला बॉल थेट स्टम्पसमोर पॅडला आदळला. बुमराहने जोरदार अपिल केलं आणि पाथम निशंकाला बाद घोषित करण्यात आलं. बुमराहने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या विरुद्ध बाजूला वळाल्याने फलंदाज गोंधळला. त्याला एक एलबीडब्यू आऊट घोषित करण्यात आलं. मात्र श्रीलंकने रिव्ह्यू घेतला. त्यावेळी चेंडू स्टम्पवरील भागाला लागून बेल्स उडवत असल्याचं स्पष्ट झालं आणि अंपायर्स कॉल असं पंचांनी सांगितल्यानंतर पाथम निशंकाला बाद घोषित करण्यात आलं.
मुंबईतील सामन्यामधील पराभवासहीत श्रीलंकन संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडला आहे. तर सेमीफायनलसाठी पात्र ठरणारा भारत पाहिला संघ ठरला आहे. भारताने वर्ल्ड कप 2023 मधील आपले 7 ही सामने जिंकले आहेत.