'मी अजिबात दाखवत नव्हतो, पण आतून इतका...,' श्रेयस अय्यरने WC फायनलआधी केला मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने सेमी-फायनलमध्ये तुफानी फलंदाजी करत  70 चेंडूत 105 धावा ठोकल्या. यानंतर त्याने पहिल्यांदाच मोठा खुलासा केला.   

शिवराज यादव | Updated: Nov 17, 2023, 05:25 PM IST
'मी अजिबात दाखवत नव्हतो, पण आतून इतका...,' श्रेयस अय्यरने WC फायनलआधी केला मोठा खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघाने सेमी-फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत दणक्यात फायनल गाठली आहे. सेमी-फायनल सामन्यात विराट कोहली, शुभमन गिल आणि मोहम्मद शमी यांच्यासह श्रेयस अय्यरनेही स्फोटक फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारताने या सामन्यात 397 धावांचा डोंगर उभा केला होता. न्यूझीलंड संघ मात्र 48.5 ओव्हर्समध्ये सर्वबाद झाला आणि 70 धावांनी पराभूत झाला. विराट कोहलीने या सामन्यात सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड मोडत 50 शतकं ठोकली. तर दुसरीकडे श्रेयस अय्यरने 67 चेंडूत शतक ठोकलं. 

श्रेयस अय्यरला वर्ल्डकपच्या सुरुवातीला फार टीका सहन करावी लागली होती. ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्याच सामन्यात श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाला होता. यानंतरच्या पुढील दोन सामन्यात त्याने 25 आणि 53 धावा करत सर्वांना निराश केलं होतं. सुरुवात चांगली केल्यानंतर श्रेयस अय्यर मोठ्या धावसंख्येत रुपांतर करण्यात अपयशी ठरत असल्याची टीका त्याच्यावर होऊ लागली होती. यानंतर बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने 19, 33 आणि 4 धावा केल्या. श्रेयस अय्यरला शॉर्ट-पिच डिलिव्हरी खेळताना अडचण होत असल्याने अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.  

पण श्रेयस अय्यरने आपल्या बॅटनेच सर्व टीकाकारांना उत्तर देत तोंड बंद केलं आहे. यानंतरच्या पुढील चारही सामन्यात श्रेयस अय्यरने 50 पेक्षा अधिक धावा केल्या. श्रीलंकेविरोधात 82, दक्षिण आफ्रिकेविरोधात 77 आणि नेदरलँड, न्यूझीलंडविऱोधात त्याने शतक ठोकलं. न्यूझीलंडविरोधात स्फोटक फलंदाजी केल्यानंतर श्रेयस अय्यरने आपल्यावर सतत होणाऱ्या टीकेमुळे संतापलो होतो असा खुलासा केला आहे. 

"वर्ल्डकपच्या सुरुवातीला पहिल्या एक-दोन सामन्यात मी चांगली कामगिरी करु शकलो नाही. मला सुरुवात चांगली मिळत होती. पण मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत होतो. पण तुम्ही आकडे पाहिले तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरोधात मी नाबाद होतो. नंतर दोन सामने चांगला खेळ झाला नाही. यानंतर लोक माझ्यात समस्या आहे असं बोलू लागले. मी आतून फार संतापलो होतो. मी ते दाखवत नव्हतो. पण वेळ येईल आणि मी स्वत:ला सिद्ध करेन हे मला माहिती होतं. आणि आता ती योग्य वेळ आली आहे," असं श्रेयस अय्यर म्हणाला आहे.

दुखापतीनंरतर सप्टेंबरमध्ये आशिया चषक स्पर्धेत श्रेयस अय्यरने पुनरागमन केलं होतं. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाठदुखीमुळे त्याला पुन्हा बाहेर बसावं लागलं होतं. त्याने उर्वरित स्पर्धेत भाग घेतला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत त्याने पुनरागमन केलं आणि शतक ठोकलं.