पाकिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर निष्प्रभ ठरल्याने माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तर संतापला आहे. शोएब अख्तरने पाकिस्तानी संघाला खडे बोला सुनावताना भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारताने टॉस जिंकल्यानंतर पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी दिली होती. पण सुरुवात चांगली झाल्यानंतर नंतर मात्र पाकिस्तान संघ ढेपाळला आणि 191 धावांवर गारद झाला. यामुळे शोएब अख्तरने नाराजी जाहीर करणारा एक व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.
शोएब अख्तरने इतकं चांगलं मैदान आणि संधी असतानाही त्याचं सोनं करणार एकही चांगला खेळाडू आमच्याकडे नाही अशी खंत व्यक्त केली आहे. "किती सुंदर विकेट होती. किती जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळाला होता. पण पाकिस्तान त्याचा फायदा उचलू शकला नाही. जास्त धावा करणारं किंवा त्या संधीचं सोनं करणारं एकही टॅलेंट नाही हे पाहून फार वाईट वाटलं," असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
"फलंदाजीसाठी इतकी चांगली असणाऱ्या खेळपट्टीवर सामना गमावला. चेंडू काहीच करत नसताना तिरक्या बॅटने किंवा उभं राहून कशाला खेळत आहात. इतकी चांगली संधी गमावली," अशी खंत शोएब अख्तरने व्यक्त केली. "भारताच्या फिरकी गोलंदाजींना जबरदस्त कामगिरी केली. रोहित शर्मानेही किती चांगलं नेतृत्व केलं आहे. त्याने आपल्या गोलंदाजीत किती चांगले बदल केले," असं कौतुकही शोएब अख्तरने केलं आहे.
What a waste of opportunity on a great batting wicket. Disappointed. Very disappointed. pic.twitter.com/2EnC1z9zni
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 14, 2023
मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी दिलेल्या सुरुवातीच्या धक्क्यांमुळे पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी बसवलेली घडी विस्कटली. पाकिस्तान संघ पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकला नाही. 42.5 ओव्हरमध्ये संपूर्ण संघ गारद झाला. पाकिस्तानचा ही वर्ल्डकपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1999 मध्ये पाकिस्तान संघ 180 धावांवर सर्वबाद झाला होता.
पाकिस्तान संघाकडून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करत डाव सावरला होता. बाबर आझमने 58 चेंडूत 50 धावा केल्या. तर मोहम्मद रिजवान 49 धावांवर बाद झाला. पण त्यांच्यानंतर विकेट्सची रांगच लागली आणि 191 धावात सगळा संघ तंबूत परतला.