Semi Finals मध्ये भारताला हरवणं सहज शक्य फक्त...; मिसबाहचा रोहितच्या संघाला इशारा

Warning To Team India Before Semi Final: भारताने आतापर्यंत साखळीफेरीमध्ये आपले 8 ही सामने जिंकले असून 16 गुणांसहीत भारत पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2023, 01:16 PM IST
Semi Finals मध्ये भारताला हरवणं सहज शक्य फक्त...; मिसबाहचा रोहितच्या संघाला इशारा title=
एका चर्चासत्रादरम्यान व्यक्त केलं हे मत

Warning To Team India Before Semi Final: रविवारी, 5 नोव्हेंबर 2023 रोजी कोलकात्यामधील ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला. पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या या दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसं काहीही घडलं नाही. 326 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 83 धावांवर बाद करत सामना 243 धावांनी जिंकला. भारताचा हा स्पर्धेमधील 8 वा विजय ठरला. आता भारताचा शेवटचा सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलॅण्ड्सविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरच सेमीफायनल्ससाठी पात्र ठरला होता. भारताच्या एवढ्या दमदार कामगिरीनंतरही पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिसबाह-उल-हकने भारतीय संघासाठी इशारा जारी केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या खऱ्या कमतरता उघडपणे समोर आल्याचा दावा मिसबाह-उल-हकने केला आहे. भारताला पराभूत करणं शक्य असून त्यासाठी एक गोष्ट केली पाहिजे असं मिसबाह-उल-हकने म्हटलं आहे.

यापूर्वी 2003, 2015 आणि 2019 मध्ये असाच प्रकार घडलेला

भारतीय संघाने साखळीफेरीमधील सर्व सामने जिंकण्याचा पराक्रम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सध्या सुरु असलेल्या पर्वाप्रमाणेच भारताने 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना न गमावता सलग 8 सामने जिंकलेले. 2015 मध्ये आता ज्याप्रकारे भारताने साखळीफेरीत एकही सामना गमावला नाही त्याचप्रमाणे दमदार कामगिरी करत अपराजित राहिला होता. तसेच 2019 मध्ये भारत पॉइण्ट्स टेबलवर टॉपवर राहत सेमीफायनल्सपर्यंत पोहोचला होता, अगदी आता पोहोचला आहे तसाच. मात्र या तिन्ही पर्वांमध्ये भारताला जेतेपदावर नाव कोरता आलं नव्हतं. भारतीय संघ नॉकआऊट फेरीत म्हणजेच बादफेरीत बाहेर पडला होता. भारत 2015, 2019 मध्ये सेमीफायनलला पराभूत झाला तर 2003 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने अंतिम सामना गमावला. भारतीय संघ महत्त्वाच्या सामन्यांमध्येच म्हणजेच करो या मरोच्या सामन्यांमध्ये तणावाखाली कच खातो आणि स्पर्धेतून बाहेर पडतो. 

भारताला पराभूत करण्याची चांगली संधी

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने विजय मिळवल्यानंतर मिसबाह-उल-हकने 'ए स्पोर्ट्स'शी बोलताना सेमीफायनलमध्ये इतर संघांना अधिक चांगली संधी असल्याचं म्हटलं आहे. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वात आवडीचा संघ आणि स्थानिक संघ म्हणून बादफेरीमध्ये भारतीय संघ प्रचंड दडपणाखाली असेल असं मिसबाह-उल-हकने म्हटलं आहे.

अजूनही संधी आहे

"एक गोष्ट निश्चित आहे. साखळी फेरीमध्ये ते फेव्हरेट आहेत हे ठीक आहे. पण बादफेरीमध्ये जसे इतर संघ चांगले खेळतील तसे ते संघही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी अधिक फेव्हरेट होतील. असं झाल्यास भारतीय संघावरील दबाव वाढेल. 1-2 ओव्हरमध्ये संघाला दबावाखाली टाकल्यानंतर त्यांच्याकडे गमावण्यासाठी बरंच काही असेल. इतर संघांना अजूनही या माध्यमातून संधी आहे," असं मिसबाह-उल-हक म्हणाला.

हा संघ देईल भारताला कडवी झुंज

या चर्चेमध्ये पाकिस्तानचा माजी फलंदाज शोएब मलिकही सहभागी झाला होता. त्याने मिसबाह-उल-हकच्या मतावर बोलताना, "मला वाटतं ऑस्ट्रेलिया त्यांना (भारताला) कडवी झुंज देईल," असं म्हटलं. यावर मिसबाह-उल-हकने सहमती दर्शवली. ऑस्ट्रेलियन संघ अद्याप सेमीफायनलसाठी पात्र ठरलेला नाही. तरी सध्या स्पर्धेत असलेल्या संघांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ हा सेमीफायनलमध्ये पात्र ठरण्यासाठी फेव्हरेट मानला जात आहे.

भारताला पराभूत करण्यासाठी हे करा

आतापर्यंतच्या वर्ल्ड कप स्पर्धेमधील कामगिरी पाहता भारतीय संघाच्या धावांची रासच सामना सुरु होण्याआधी मानसिक स्तरावर सामना अर्ध्याहून अधिक जिंकलेला असतो. त्यामुळेच भारताविरुद्ध खेळताना सर्व संघांनी त्या मानसिकतेमधून बाहेर पडून आपली सामर्थ्यस्थळं लक्षात घेत खेळलं पाहिजे, असं मिसबाह-उल-हक म्हणाला.

"मानसिक दृष्ट्या तुम्ही आधी परिस्थितीकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हवं. ते प्रत्येक संघाला दबावाखाली टाकून ते 50 टक्के सामना जिंकतात. त्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत केलेली कामगिरी दडपण तयार करायला मदत करते. त्यामुळेच या तणावामधून वर येत मानसिकदृष्ट्या भक्कम राहत भारताला आपण हारवू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे," असं मिसबाह-उल-हक म्हणाला.