'ऐकायला आवडणार नाही पण विराट किंग वगैरे नाही'; शोएब मलिक अन् वसिम अक्रमने हे ऐकताच...

Virat Kohli is Not King: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्याचा निकाल लागल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रामध्ये हा प्रकार घडला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 7, 2023, 12:34 PM IST
'ऐकायला आवडणार नाही पण विराट किंग वगैरे नाही'; शोएब मलिक अन् वसिम अक्रमने हे ऐकताच... title=
भारत दक्षिण आफ्रिका सामन्यानंतरची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल

Virat Kohli is Not King: भारतामध्ये वर्ल्ड कप 2023 बद्दल जेवढी उत्सुकता आहे तेवढीच उत्सुकता या स्पर्धेबद्दल पाकिस्तानमध्येही आहे. अर्थात शेजारच्या संघाला नावाला साजेशी कामगिरी या स्पर्धेत करता आलेली नसून त्यांचं सेमीफायनलचं गणितही तळ्यात-मळ्यात आहे. पाकिस्तानी संघावर टीका होत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानमधील क्रिकेट विश्वामध्ये आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमध्ये भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांच्या नावांची सध्या पाकिस्तानमध्ये चांगलीच चर्चा आहे. रविवारी कोलकात्यामधील ईडन गार्डन्समधील मैदानात झालेल्या सामन्यामध्ये भारताने पॉइण्ट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकाच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघावर विजय मिळवला. आफ्रिकेच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 83 धावांवर बाद करत भारताने सामना 243 धावांनी जिंकला. या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या नाबाद 101 धावांच्या मदतीने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. विराटच्या या खेळीचं पाकिस्तानमध्येही कौतुक होत असतानाच एका अँकरने मात्र लाईव्ह शोदरम्यान विराट कोहली काही किंग बिंग नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्याने पुढे व्यक्त केलेल्या मताशी पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम आणि माजी फलंदाज शोएब मलिकनेही सहमती दर्शवली आहे.

कोहली किंग नाही

भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याचं विश्लेषण करताना वसिम अक्रमने, "रोहित बाद झाल्यानंतर किंग कोहली मैदानात आला. खेळपट्टीवर टिकून राहणं अवघड होतं. खेळणं सोपं नव्हतं. चेंडू अडकत होता," असं म्हटलं. वसिम अक्रमचं म्हणणं ऐकून अँकरने त्याला मध्येच अडवत, "तो किंग नाही. तो किंग नाही असं मला वाटतं. सॉरी तुम्हाला ऐकायला हे आवडत नसेल पण तो मला किंग वाटत नाही. आता तो सम्राट झाला आहे. त्याने सम्राट पद मिळवलं आहे," असं म्हणताच वसिम अक्रम हसू लागला. "त्याचा रेकॉर्ड पाहिला तर त्याने 200 च्या वर खेळीमध्ये 49 शतकांचा विक्रम केला आहे. त्याने ज्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे त्या सचिन तेंडुलकरने 400 हून अधिक डावांमध्ये 49 शतकं केली होती," असं अँकर म्हणाला. त्यावर वसिम अक्रमने, "462 डावांमध्ये केला विक्रम (सचिनने)" असं म्हटलं.

शोएब मलिक म्हणाला, 'त्याच्या शतकाचं वैशिष्ट्यं म्हणजे...'

पुढे आकडे वाचून दाखवत अँकरने, "सचिनला 451 डाव लागले तर विराटला 277 डाव लागले. हे अविश्वसनिय आहे," असं म्हणत विराटचं कौतुक केलं. "विराटचं कौतुक करायला शब्द कमी पडतात. त्याने ग्रेट सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मात्र अजून एक गोष्ट म्हणजे त्याने केलेल्या शतकांमुळे संघ जिंकला आहे. 100 धावा करण्याला श्रेय दिलं पाहिजे. पण सामना जिंकून देण्याहून अधिक उत्तम काही नाही. इतर खेळाडू बाद झाले तरी तो असा खेळत असतो की धावा येत राहतात. या वर्ल्ड कपमध्येही आपण तेच पाहिलं. मागील अनेक वर्षांपासून आपण हेच पाहत आहोत," असं शोएब मलिक म्हणाला.

विराटच्या फिटनेसचंही कौतुक

विराटच्या फिटनेसहीचंही शोएब मलिकने कौतुक केलं. "त्याची फिजिकल फिटनेस अगदी नेक्स्ट लेव्हल आहे. तो आज 35 वर्षांचा झाला आहे. पण आजही त्याला पळता पाहिल्यास 25 वर्षांचा तरुण पळतोय असं वाटतं," अशी प्रतिक्रिया शोएब मलिकने नोंदवली.