तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....'

रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दरम्यान रोहित शर्माने श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.   

शिवराज यादव | Updated: Nov 2, 2023, 11:53 AM IST
तू रेकॉर्डचा विचार करत नाहीस का? प्रश्न ऐकताच रोहित म्हणाला 'मी इतका स्वार्थी....' title=

भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, सेमी-फायनल गाठली आहे. भारताने सर्वच्या सर्व 6 सामने जिंकले असून आज तुलनेने दुबळ्या श्रीलंकेशी भिडणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. रोहित शर्माने 6 सामन्यांमध्ये 66.33 च्या सरासरीने 334 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 119.16 असून, भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्तम आहे. खासकरुन पॉवरप्लेमध्ये रोहित शर्मा जास्त परिणामकारक ठरत आहे. 

दरम्यान श्रीलंकेविरोधातील सामन्याआधी रोहित शर्माने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला निस्वार्थ भावनेने फलंदाजी करण्याबद्दल विचारण्यात आलं. "वर्ल्डकपमध्ये तू निस्वार्थ भावनेने फलंदाजी करत आहे, त्याचं कौतुक होत आहे. तू कोणताही रेकॉर्ड करण्यापेक्षा चांगली खेळी करण्याकडे लक्ष देत आहेस. पॉवरप्लेमध्ये तू सर्वाधिक धावा केल्या आहेस. काही माजी खेळाडूंना संघासाठी स्वार्थी झालात तर बरं होईल असा सल्लाही दिला आहे," असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. 

हा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा काही सेकंदासाठी शांत बसला होता. यानंतर त्याने संघाच्या मीडिया मॅनेजरकडेही पाहिलं असता सगळेजण जोरजोरात हसू लागले होते. नंतर त्याने सविस्तर उत्तर देत सांगितलं की, "हो मी सध्या फलंदाजीचा आनंद लुटत आहे. पण ते करताना संघाची स्थिती काय आहे याचाही विचार डोक्यात असतो. नुसतेच फटके मारत सुटायचे असं काही नसतं. मला योग्य आणि चांगली फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीत आणायचं असतं. अशीच माझी विचारसरणी आहे".

"मी सुरुवातीला फलंदाजीला जात असल्याने विचार करुन खेळावं लागतं. याचं कारण माझ्या खेळीने संपूर्ण चित्र तयार होत असतं. त्यामुळे माझ्याकडे चांगली संधी किंवा फायदा असतो असं तुम्ही म्हणू शकता. कारण माझ्यावर विकेट गेल्याचा काही दबाव नसतो. त्यामुळे जेव्हा 0-0 अशी स्थिती असते तेव्हा तुम्ही न घाबरता आणि जसं हवं तसं खेळू शकता," असं रोहित शर्माने सांगितलं. 

"जर तीन विकेट गमावल्या असतील तर एक फलंदाज म्हणून तुम्हाला संघासाठी जे योग्य आहे ते करावं लागतं. पहिल्या ओव्हरमध्ये काय गरज आहे, पाचव्यात काय आणि दहाव्या ओव्हरमध्ये काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. संघाची धावसंख्या किती आहे, किती धावांचा पाठलाग करत आहोत, या मैदानावर किती धावसंख्या उभारणं गरजेचं आहे? या सगळ्याचा विचार केला जातो. त्यामुळे त्यावेळी जशी गरज असते त्यानुसार मी खेळत असतो," असं रोहित शर्मा म्हणाला/