भारताने जे दोनदा केलं ते पाकिस्तानला एकदा जरी जमलं तरी Semifinal चं तिकीट Fix

World Cup 2023 Points Table Pakistan Semi Final Chances: सध्याच्या घडीला न्यूझीलंड चौथ्या स्थानी असून पाकिस्तान पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना शनिवारी होणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 10, 2023, 01:20 PM IST
भारताने जे दोनदा केलं ते पाकिस्तानला एकदा जरी जमलं तरी Semifinal चं तिकीट Fix title=
पाकिस्तानचा शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध शनिवारी होत आहे

World Cup 2023 Points Table Pakistan Semi Final Chances: भारतात सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील 41 व्या सामन्यात गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेला 5 विकेट्स अन् 26.2 ओव्हर राखून दणदणीत विजय मिळवला. या मोठ्या विजयामुळे न्यूझीलंडचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. न्यूझीलंडच्या या दमदार विजयाचा फटका पाकिस्तानला बसला असून पाकिस्तान वर्ल्ड कपच्या शर्यतीमधून बाहेर पडल्यात जमा आहे. मात्र अजूनही पाकिस्तानकडे एक फार कमी शक्यता असलेली संधी आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ 5 वेळा घडलेला पराक्रम पाकिस्तानने अजून एकदा करुन दाखवला तर त्यांना सेमीफायलनचं तिकीट मिळू शकतं. विशेष म्हणजे ज्या पराक्रमबद्दल आपण बोलत आहोत तो याच वर्ल्ड कपमध्ये 2 वेळा झाला आहे. हा पराक्रम नेमका काय आहे आणि कोणी केलेला हे पाहूयात..

पॉइण्ट्स टेबलमध्ये स्थिती काय?

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असून सेमीफायलनसाठी ते पात्र ठरले आहेत. चौथ्या स्थानावर सध्या न्यूझीलंडचा संघ असून त्यांचं स्थान अबाधित राहिल असं दिसत आहे. मात्र पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अविश्वसनिय कामगिरी केली तर ते चौथ्या स्थानावर झेप घेऊ शकतात. सध्या पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये चुरस असली तरी तांत्रिक दृष्ट्या अफगाणिस्तानही अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीमधून बाहेर पडलेला नाही. 

तिन्ही संघाची स्थिती काय?

न्यूझीलंडने साखळीफेरीतील शेवटचा सामना जिंकून चौथं स्थान कायम राखलं आहे. न्यूझीलंडने 9 पैकी 5 सामने जिंकले असून 10 पॉइण्ट्सहीत ते +0.743 नेट रन रेटसहीत चौथ्या स्थानी आहेत. 10 पॉइण्ट्सपर्यंत मजल मारण्याची संधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानलाही आहे. मात्र त्यांना नेट रन रेटमध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी भीमपराक्रमच करावा लागणार आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +0.036 असून अफगाणिस्तानचा नेट रन रेट -0.338 इतकं आहे. 

पाकिस्तानला काय करावं लागेल?

पाकिस्तानला आता केवळ शेवटचा सामना जिंकून चालणार नाही. त्यांना आपला +0.036 हा नेट रन रेट न्यूझीलंडच्या नेट रन रेटपेक्षा म्हणजेच +0.743 हून अधिक सरस करण्यासाठी पहिल्यांदा फलंदाजी केल्यास 287 धावांच्या फरकाने इंग्लंडला पराभूत करावं लागेल. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला 284 चेंडू बाकी ठेऊन सामना जिंकावा लागेल. म्हणजेच त्यांना 2.4 ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागेल. आता यापैकी दुसरी गोष्ट अशक्य वाटत असली तरी धावांचं अंतर ठेऊन सामना जिंकणं पाकिस्तानला अगदीच अशक्य वाटण्यासारखं नाही कारण एवढ्या मोठ्या फरकाने सामना एखाद्या संघाने जिंकल्याचा प्रकार याच वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा घडला आहे.

पाचवेळा असं घडलं की...

एकदिवसीय सामन्यामध्ये 287 धावांनी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवण्याचा पराक्रम 5 वेळा 4 संघांनी केला आहे. भारताने याच वर्षी जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धचा सामना 317 धावांनी जिंकला होता. सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने नेदरलॅण्डला 309 धावांनी धूळ चारली. तर जून 2023 मध्ये झिम्बाब्वेने अमेरिकेच्या संघाला 304 धावांनी हरवलं होतं. भारतानेही सध्या सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये एकदा 300 हून अधिक धावांनी प्रतिस्पर्धाला पराभूत केलं आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना 302 धावांनी जिंकला होता. तसेच न्यूझीलंडनेही 2009 साली आयर्लंडला 290 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे आता पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात असा पराक्रम करता आला तर ते नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडहून सरस ठरतील आणि सेमीफायलनमध्ये भारताविरुद्ध मैदानात उतरलेले पाहायला मिळतील.

इंग्लंड करो या मरो पद्धतीने खेळणार

इंग्लंडच्या संघाची वर्ल्ड कप 2023 मधील कामगिरी पाहता ते फार तगडी स्पर्धा पाकिस्तानला देतील असं वाटतं नाही. मात्र आपल्या शेवटच्या सामन्यात इंग्लंडनेही 160 धावांनी नेदरलॅण्डला धूळ चारली असल्याने आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साली अव्वल 7 संघांमध्ये समावेश व्हावा म्हणून इंग्लंडचा संघही करो या मरो पद्धतीनेच खेळणार हे निश्चित.