बांगलादेशविरोधात खेळताना गिलने कॉलरवर सोन्याचं नाणं का लावलं होतं? अंधश्रद्धा की इतर काही?

बांगलादेशविरोधातील सामन्यात शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावा ठोकल्या. दरम्यान, त्याच्या टी-शर्टच्या कॉलरवरील सोन्याच्या नाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 20, 2023, 05:58 PM IST
बांगलादेशविरोधात खेळताना गिलने कॉलरवर सोन्याचं नाणं का लावलं होतं? अंधश्रद्धा की इतर काही? title=

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश संघ भिडले. भारताने या सामन्यात बांगलादेशचा सहजपणे पराभव करत आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिलने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. दरम्यान, शुभमन गिल मैदानात आला तेव्हा त्याच्या टी-शर्टच्या कॉलरवर सोन्याचं छोटं नाणं लावल्याचं दिसत होतं. यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा रंगली होती. 

बांगलादेशने प्रथम फलंदाजी केल्यानंतर 257 धावांचं आव्हान दिलं होतं. यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात आल्यानंतर बांगलादेशी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 88 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर ही भागीदारी संपली. पण यानिमित्ताने शुभमन गिल सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचा आनंद चाहत्यांनी व्यक्त केला आहे. शुभमन गिलने 55 चेंडूत 53 धावा करत वर्ल्डकप संघातील आपली निवड सार्थ ठरवली आहे. 

शुभमन गिलच्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असलं तरी चर्चा मात्र त्याच्या टी-शर्टच्या कॉलरवर असणाऱ्या सोन्याच्या नाण्याची होती. नाण्याप्रमाणे दिसणाऱ्या या वस्तूने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर प्रत्येजण आपापले अंदाज व्यक्त करु लागले. काहींना शुभमन गिलने लक म्हणून ते लावलं असावं असा अंदाज लावला. पण यामागील कारण वेगळं आहे. 

गिलच्या कॉलर असणारं हे सोन्याचं नाणं सप्टेंबरमध्ये 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्काराने गौरवण्यात आलं. आशिया चषक आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दिलेल्या योगदानाबद्दल त्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

हा पुरस्कार मिळाल्यानंतर शुभमन गिलने आपल्याला अजून चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाल्याचं म्हटलं होतं. "सप्टेंबर महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणं आणि संघाच्या कामगिरीत योगदान देणं हे माझं सुदैव आहे. हा पुरस्कार मला आणखी उत्कृष्ठ कामगिरी करण्यास आणि देशाचा सन्मान वाढवण्याची प्रेरणा देईल,” अशा भावना गिलने पुरस्कार मिळाल्यानंतर व्यक्त केल्या होत्या. 

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, बांगलादेशने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या पहिल्या जोडीने 91 धावांची भागीदारी करत निर्णय सार्थ ठरवला होता. पण यानंतर बांगलादेशचे विकेट्स एकामागोमाग तंबूत परतत राहिले. अखेरच्या काही फलंदाजांच्या जोरावर बांगलादेशने 50 ओव्हर्समध्ये 8 गडी गमावत 256 धावा केल्या. रवींद्र जाडेजा, बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतले. 

257 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्माने 40 चेंडूत 48 धावा करत दमदार सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनेही 53 धावा ठोकल्या. यानंतर विराट आणि के एल राहुलने संघाला विजयापर्यंत नेलं. विराटने यावेळी 78 वं शतक ठोकलं. त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.