'तो निर्णय मुर्खपणाचा...' वर्ल्ड कप फायनलबद्दल अंबाती रायडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

World Cup 2023: लोकांना वाटत होते की खेळपट्टी संथ करून आम्ही भारतीय संघाला मदत करतोय, पण इथे उलटच घडल्याचे अंबाती रायडू म्हणाला.

Pravin Dabholkar | Updated: Nov 26, 2023, 01:55 PM IST
'तो निर्णय मुर्खपणाचा...' वर्ल्ड कप फायनलबद्दल अंबाती रायडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ title=
Ambati Rayudu On World Cup

ICC ODI World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलियासोबत हरणे हे प्रत्येक भारतीयाच्या जिव्हारी लागले आहे. आठवडा उलटून गेला तरी या दु:खातून भारतीय क्रिकेटप्रेमी सावरु शकले नाहीत. प्रत्येकजण झालेल्या चुकांचा मागोवा घेत असून आपापले तर्क लावत आहे. दरम्यान माजी क्रिकेटर अंबाती रायडूच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. 

वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम साम्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून सहाव्यांदा विजेतेपद पटकावले आहे. टीम इंडियाने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली होती. दहापैकी दहा सामने जिंकले होते पण अंतिम सामन्यात संघाने अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यातील खेळपट्टीबाबत अनेक बातम्या येत होत्या. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने अंतिम सामन्यातील संथ खेळपट्टीबाबत मोठे विधान केले आहे. 

माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूच्या म्हणण्यानुसार, अहमदाबादमधील खेळपट्टी वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी योग्य नव्हती. फायनलसारखा मोठा सामना इतक्या संथ खेळपट्टीवर खेळवायला नको होता, असेही तो म्हणतो. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना अंबाती रायुडूने हे विधान केले आहे. 

'वर्ल्ड कप फायनलसाठी विकेट खूप संथ होती. मला माहित नाही की ही कल्पना कोणाची होती. अंतिम सामन्यासाठी एक साधी खेळपट्टी देखील कार्य करू शकली असती, कारण आम्ही ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी करत होतो. मात्र,त्या काळात चांगली खेळपट्टीची साथ मिळायला हवी होती,जी दुर्दैवाने मिळाली नाही', असे अंबाती रायडूने म्हटले.

'लोकांना वाटत होते की खेळपट्टी संथ करून आम्ही भारतीय संघाला मदत करतोय, पण इथे उलटच घडले आणि आम्ही स्वतःच खेळपट्टीत अडकत गेलो', असे रायडू म्हणला. खेळपट्टीचा वेग कमी करण्याची गरज होती असे मला वाटत नाही. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची ताकद आमच्या संघात आहे. मात्र, खेळपट्टी 100 षटकांची तशीच राहिली पाहिजे. टॉस जिंकणे हे महत्वाचे राहायला नकोय, असे तो म्हणाला. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकात 240 धावा केल्या. विराट कोहली आणि केएल राहुलने संघाकडून अर्धशतके झळकावली. तर रोहित शर्माने 47 धावांची जलद खेळी केली. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने हा सामना 6 गडी राखून जिंकला. संघाने 43 षटकांत 4 गडी गमावून 241 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने संघासाठी शानदार शतक झळकावले आणि भारतीय चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.