World Cup 2019 : इंग्लंड नाही, ही टीम गाठणार ५०० रनचा आकडा

क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे.

Updated: May 29, 2019, 06:14 PM IST
World Cup 2019 : इंग्लंड नाही, ही टीम गाठणार ५०० रनचा आकडा title=

ब्रिस्टल : क्रिकेट वर्ल्ड कपला गुरुवारपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. सगळे सराव सामने आता संपले असून गुरुवारी लंडनच्या ओव्हलमधल्या केनिंग्टन मैदानात यंदाच्या वर्ल्ड कपची पहिली मॅच खेळवली जाईल. वर्ल्ड कप सुरु व्हायच्या आधीच इंग्लंडला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. इंग्लंडमधल्या सपाट खेळपट्ट्या बघता यावेळी ५०० चा स्कोअर पार होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वेस्ट इंडिज टीमचा खेळाडू शाय होप म्हणाला, आमची टीम ५०० रनचा आकडा गाठू शकते. न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ४२१ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड ४८ ओव्हरमध्ये ३३० रन करून ऑल आऊट झाली. यामुळे न्यूझीलंडचा ९१ रननी पराभव झाला.

या मॅचमध्ये वेस्ट इंडिजकडून शाय होपने सर्वाधिक १०१ रन केले. आयसीसीच्या वेबसाईटशी बोलताना शाय होप म्हणाला, 'आम्ही ५०० रनचा आकडा गाठण्याचा प्रयत्न करू. ५०० रनचा आकडा पार करणारी पहिली टीम बनणं नक्कीच चांगलं असेल. आमच्याकडे असलेली बॅटिंग बघता हे लक्ष्य गाठणं शक्य आहे.'

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर कार्लोस ब्रॅथवेटही शाय होपच्या मताशी सहमत आहे. 'आम्ही ५०० रन करण्यासाठी सक्षम आहोत. पण अधिकृत मॅचमध्ये तुमच्याकडे १० आणि ११व्या क्रमांकावर बॅटिंगचे पर्याय उपलब्ध नसतील, जे सराव सामन्यात होते. त्यामुळे तुम्हाला वास्तवाचं भानही असलं पाहिजे,' अशी प्रतिक्रिया ब्रॅथवेटने दिली.

सराव सामन्यांमध्ये टीममधल्या सगळ्या १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यायची मुभा आयसीसीने दिली होती. पण फिल्डिंगवेळी मैदानात फक्त ११ खेळाडूंनाच असण्याची परवानगी होती.