'चिंता नको, याला चौथ्या क्रमांकावर खेळव'; हेडनचा कोहलीला सल्ला

वर्ल्ड कप आधीची शेवटची सीरिज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ वनडे आणि ५ टी-२० मॅचमध्ये भारतीय टीमची प्रयोगशाळा झाली होती.

Updated: Mar 14, 2019, 09:53 PM IST
'चिंता नको, याला चौथ्या क्रमांकावर खेळव'; हेडनचा कोहलीला सल्ला title=

मुंबई : वर्ल्ड कप आधीची शेवटची सीरिज म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २ वनडे आणि ५ टी-२० मॅचमध्ये भारतीय टीमची प्रयोगशाळा झाली होती. ५ वनडेमध्ये चौथ्या क्रमांकावर भारतीय टीमने तब्बल तीन वेगवेगळ्या खेळाडूंना संधी दिली. पण यातल्या एकाही खेळाडूला २५ पेक्षा जास्त रन करता आल्या नाहीत. पाचव्या वनडेमध्येही चौथ्या क्रमांकावर खेळणारा पंत अपयशी ठरला. वर्ल्ड कपआधीची भारताची ही शेवटची वनडे होती. याआधी भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो, असे संकेत दिले होते. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा संभ्रम अजूनही कायम आहे.

'वर्ल्ड कपसाठी आमचे अंतिम-११ जवळपास निश्चित आहेत. पण एका क्रमांकासाठी अजूनही निर्णय झालेला नाही', असं विराट पाचव्या वनडेनंतर म्हणाला. विराटनं या क्रमांकाचा उल्लेख केला नसला तरी तो चौथ्या क्रमांकावर बोलत होता हे कोणीही सांगेल.

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन याने चौथ्या क्रमांकाबाबत कर्णधार विराट कोहलीला सल्ला दिला आहे. अंबाती रायु़डू हाच चौथ्या क्रमांकासाठी योग्य असल्याचं मत हेडनने मांडलं आहे. तसंच रायुडूसोडून भारत इतर खेळाडूंचा चौथ्या क्रमांकासाठी विचार करत आहे, हे ऐकून मी हैराण झालो आहे, असं वक्तव्य हेडनने केलं आहे.

'माझ्यासाठी रायुडू उपयुक्त आहे. भारतीय टीम याबद्दल प्रश्न निर्माण करत आहे, यावर माझा विश्वास बसत नाही. रायुडू बराच काळ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राहुल या क्रमांकावर खेळू शकेल, असं मला वाटत नाही. राहुलचीही वेळ येईल. त्याला तिसरा ओपनर म्हणून वर्ल्ड कपला नेलं पाहिजे', अशी प्रतिक्रिया हेडनने दिली.

चौथ्या क्रमांकावर रायुडू हा भारताचा सध्याचा सगळ्यात यशस्वी बॅट्समन ठरला. त्यानं चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना १४ इनिंग खेळल्या. यामध्ये रायुडूने एक शतक आणि दोन अर्धशतकं केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडेमध्ये रायुडूला संधी देण्यात आली नव्हती.

चौथ्या क्रमांकावर तिघांचा वापर

भारताने पहिल्या तीन वनडेमध्ये अंबाती रायुडूला चौथ्या क्रमांकावर खेळवलं. रायुडूने ३ मॅचमध्ये अनुक्रमे १३, १८ आणि २ रन केले. यानंतर चौथ्या वनडेमध्ये रायुडूला टीममधून बाहेर ठेवण्यात आलं.

भारतीय टीमने चौथ्या वनडेमध्ये रायुडूला बाहेर केलं आणि धोनीलाही विश्रांती देण्यात आली. या दोघांऐवजी राहुल आणि ऋषभ पंतला संधी देण्यात आली. पण हे दोघंही चौथ्या क्रमांकावर खेळले नाहीत. कर्णधार विराट कोहली चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला पण तो ७ रनवर आऊट झाला. राहुल या मॅचमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला होता, पण त्याला २६ रन करता आले. तर ऋषभ पंतनं पाचव्या क्रमांकावर २४ बॉलमध्ये ३६ रन केले.

दिल्लीतल्या पाचव्या वनडेमध्ये ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळला. या मॅचमध्ये पंतने चांगली सुरुवात केली. सुरुवातीला पंतने एक फोर आणि एक सिक्स मारली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १६ रन करून पंत आऊट झाला.