साऊथम्पटन : वर्ल्ड कप २०१९ मध्ये विराट कोहली टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणारा विराट कोहली हा सातवा कर्णधार आहे. वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद अजहरुद्दीन याने सर्वाधिकवेळा भारताचं नेतृत्व केलं. तर कपिल देव आणि एमएस धोनी यांनी वर्ल्ड कप जिंकवून इतिहास घडवला.
पहिल्या-वहिल्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली होती ती एस. वेंकटराघवन यांनी. वेंकटराघवन यांची एक चलाख कर्णधार अशी ओळख होती. मात्र त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारत सहापैकी केवळ एकच सामना जिंकू शकला होता. वेंकटराघवन स्वत: सहा सामन्यांमध्ये केवळ एकाच बॅट्समनला आऊट करु शकले होते. वेंकटराघवन यांनी १९७५ आणि १९७९च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्त्व केलं.
कपिल देव यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला पहिला-वहिला वर्ल्ड कप जिंकून दिला. भारतात खऱ्या अर्थानं क्रिकेट क्रांतीला सुरुवात करुन देण्यात कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखालील या वर्ल्ड कपचा मोलाचा वाटा राहिला. १९८३ वर्ल्ड कपमध्ये कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद १७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याखेरीज अंतिम सामन्यात विवियन रिचर्ड्सचा कपिल देव यांनी घेतलेला कॅच क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत.
मोहम्मद अझरुद्दीन हा एकमेव कर्णधार आहे ज्यानं तीनवेळा वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमच्या नेतृत्त्वाची धुरा सांभाळली. आपल्या नेतृत्त्वाखालील १९९२च्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये अझरुद्दीन टीमला प्रेरीत करु शकला नाही. त्या वर्ल्ड कपमध्ये भारत ८ पैकी केवळ २ सामने जिंकू शकला. त्यानंतरच्या १९९६ वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने एकहाती भारताला उपांत्य फेरीपर्यंत धडक मारुन दिली. त्यामुळे १९९६ वर्ल्ड कपमध्ये अझरुद्दीनचं काम थोडं हलंक झालं. तर १९९९ वर्ल्ड कपमध्ये अझरुद्दीन भारताला सुपर सिक्सही पार करुन देऊ शकला नाही. या वर्ल्ड कपनंतर अझरुद्दीनं मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात अडकला आणि अझरुद्दीनची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली.
सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली २००३ वर्ल्ड कपमध्ये भारत इतिहास रचण्यापासून केवळ एक विजय दूर राहिला. या वर्ल्ड कपमध्ये भारतानं अंतिम फेरीत धडक मारली होती. या वर्ल्ड कपमध्ये भारतानं अडखळत सुरुवात केली होती. मात्र खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि गांगुलीच्या सक्षम नेतृत्त्वाच्या जोरावर भारतानं अंतिम फेरी गाठली होती. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सचिननंतर गांगुलीनं स्थान पटकावलं होतं. गांगुलीनं या वर्ल्ड कपमध्ये तीन शतकं झळकावली होती.
राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली कॅरेबियन बेटांवर रंगलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताने खूपच लाजीरवाणी कामगिरी केली. साखळी फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. विशेष म्हणजे बांग्लादेशनं भारताला पराभवाची धुळ चारत भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. त्यावेळी भारतीय टीमचं प्रशिक्षकपद वादग्रस्त ग्रेग चॅपेल यांच्याकडे होतं.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतानं २०११ वर्ल्ड कपमध्ये विजेतेपदाला गवसणी घालत इतिहास रचला. भारतात रंगलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत कर्णधार धोनीनं नाबाद ९१ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. या वर्ल्ड कपमध्ये धोनीचा चाणाक्षपणा आणि दबावाच्या परिस्थितीतही शांत राहून परिस्थिती हातळण्याचं कौशल्य साऱ्या जगानं पाहिलं. मात्र धोनीला आपल्या नेतृत्त्वाखाली २०१५ वर्ल्ड कपमध्ये याची पुनरावृत्ती करण्यात अपयश आलं. या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला.
आता २०१९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमला विराट कोहलीच्या रुपात नवा कर्णधार लाभला आहे. या वर्ल्ड कपमध्ये विराटच्या कर्णधारपदाचा खरा कस लागणार असून तो आपल्या नेतृत्त्वाखाली भारताला जगज्जेतपद पटकावूण देणार का हे पाहणं रंगतदार ठरणार आहे.