मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला धोक्याचा इशारा दिला आहे. यंदाचा वर्ल्ड कप हा राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे, त्यामुळे वेळेआधीच फॉर्ममध्ये येणं टीमसाठी धोकादायक ठरेल. या फॉरमॅटमध्ये योग्यवेळी फॉर्ममध्ये येणं महत्त्वाचं असतं, असं मत सचिनने व्यक्त केला.
याआधी १९९२ साली राऊंड रॉबिन पद्धतीने वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. १९९२ सालचा हा वर्ल्ड कप सचिनचा पहिला वर्ल्ड कप होता. १९९२ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली.
राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध एक सामना खेळते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी आहेत, त्यामुळे प्रत्येक टीम ग्रुप स्टेजला ९ मॅच खेळेल. यातल्या टॉप-४ टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. सेमी फायनलमध्ये विजय झालेल्या दोन टीम फायनल खेळतील.
ऑलराऊंडर असलेला हार्दिक पांड्या महत्त्वाची भूमिका बजावेल. तसंच भारताकडे विजय शंकरसारखा खेळाडू आहे, जो बॅटिंग आणि बॉलिंग करू शकतो. कुलदीप आणि चहलसारखे मधल्या ओव्हरमध्ये विकेट काढणारे स्पिनरही आहेत. रवींद्र जडेजाकडे अनुभव आहे. जसप्रीत बुमराह हा जगातला एक नंबरचा बॉलर आहे. २०१५ वर्ल्ड कपपेक्षा यामुळे वेगळा परिणाम दिसू शकेल, असं सचिनला वाटतं. भारताचं बॉलिंग आक्रमण हे संपूर्ण आहे, असं सचिन म्हणाला.
याआधी १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप झाला होता. पण आता इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या बदलल्या आहेत. त्यावेळी आम्ही ड्युक्सच्या बॉलने खेळलो होतो. कुकाबुरा बॉलपेक्षा ड्युक्स बॉलला जास्त उसळी मिळायची. तसंच ड्युक्सचा स्विंगही वेगळा व्हायचा, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली.
यंदाच्या वर्ल्ड कपवेळी इंग्लंडमध्ये उन्हाळा आहे, त्यामुळे तापमानही जास्त असेल. पाटा खेळपट्टी आणि दोन नवीन बॉल, या सगळ्या गोष्टींमुळे बॉलरना रन वाचवणं कठीण जाईल. टी-२० क्रिकेटमुळे बॅट्समनही जास्त धोके पत्करतील. यामुळे बॉलरवर तणाव असेल, असं वक्तव्य सचिनने केलं.
दोन नवीन बॉलमुळे वनडे क्रिकेटमधला रिव्हर्स स्विंग गायब झाल्याची खंत सचिनने व्यक्त केली आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड किंवा पाकिस्तान या ४ टीम सेमी फायनलमध्ये पोहोचतील, असं भाकीत सचिनने वर्तवलं आहे.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये असोसिएट देश नसल्याने स्पर्धेच्या स्वरुपावर टीका करण्यात येत होती. मात्र स्पर्धेचे हे स्वरुप योग्य नसून यामध्ये खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक कस लागणार असल्याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलंय.
वर्ल्ड कप जिंकून हा विजय देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या जवानांना समर्पित करण्याचं विराट कोहली म्हणाला होता. यावरही सचिनने प्रतिक्रिया दिली आहे. जवान हे देशासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तुम्ही जवानांची तुलना कुणाशीही करू शकत नाही, कारण ते देशासाठी लढतात. जवानांचा आदर केला पाहिजे. जवानांसाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं वक्तव्य ही भारतीय टीमची चांगली भावना आहे, त्यांना यासाठी शुभेच्छा, असं सचिन म्हणाला.