साऊथॅम्पटन : २०१९ च्या क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या मॅचआधी विराट कोहलीने दिलेल्या एका मुलाखतीत आपलं दु:ख बोलून दाखवलं. टीम इंडियाचे खेळाडू माझ्या बॉलिंगला गांभिर्याने घेत नाहीत, असं विराट कोहली म्हणाला आहे. डिसेंबर २०१७ नंतर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉलिंग केलेली नाही.
'२०१७ साली श्रीलंकेतल्या वनडे सीरिजदरम्यान आम्ही जवळपास सगळ्याच मॅच जिंकत होतो. तेव्हा मी बॉलिंग करु का, असं धोनीला विचारलं. मी बॉलिंगसाठी तयार झालो तेव्हा, बुमराह बाऊंड्री लाईनवरून मला ओरडला आणि म्हणाला, ही मस्करी वाटते का, ही आंतरराष्ट्रीय मॅच आहे,' असं विराटने सांगितलं.
'मला जेवढा माझ्या बॉलिंगवर विश्वास आहे, तेवढा दुसरा कोणत्याच सदस्याला नाही. मला पाठीचं दुखणं सुरु झाल्यानंतर मी बॉलिंग करणं सोडून दिलं,' अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली.
विराट कोहली अजूनही नेटमध्ये बॉलिंगचा सराव करतो. विराटने वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये प्रत्येकी ४-४ अशा एकूण ८ विकेट घेतल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये विराटने १६३ बॉल टाकले, पण यातल्या एकाही बॉलवर त्याला विकेट मिळाली नाही.
'जेव्हा मी दिल्लीतल्या अॅकेडमीमध्ये सराव करायचो तेव्हा जेम्स अंडरसनच्या बॉलिंग ऍक्शनची कॉपी करायचो. नंतर जेव्हा अंडरसनविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी त्याला हे सांगतिलं. यानंतर आम्ही दोघं खूप हसलो', असं वक्तव्य विराटने केलं.