World Cup 2019: न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा

यंदाच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपला आता अवघे काही दिवस उरले आहेत.

Updated: Apr 3, 2019, 07:11 PM IST
World Cup 2019: न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप टीमची घोषणा title=

ऑकलंड : यंदाच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपला आता अवघे काही दिवस उरले आहेत. मे महिन्यापासून इंग्लंडमध्ये ५० ओव्हरच्या वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंडने त्यांच्या १५ सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. न्यूझीलंडच्या टीममध्ये चार बॅट्समन, तीन ऑलराऊंडर, चार फास्ट बॉलर आणि दोन स्पिनर यांचा समावेश आहे. यंदाच्या वर्ल्ड कपसाठीची टीम निवडणारी न्यूझीलंडची ही पहिली टीम ठरली आहे. 

न्यूझीलंडने १९७५ पासून सगळे वर्ल्ड कप खेळले आहेत. यातल्या एकाही वर्ल्ड कपमध्ये त्यांना विजय मिळवता आला नाही. तर पाचवेळा न्यूझीलंडची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये केन विलियमसनच्या नेतृत्वात खेळणारी न्यूझीलंड पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल.

न्यूझीलंडच्या टीममध्ये टॉम ब्लंडेलची निवड आश्चर्यकारक मानली जात आहे. ब्लंडेलने आत्तापर्यंत एकही वनडे मॅच खेळलेली नाही. टॉम ब्लंडेलची निवड विकेट कीपर म्हणून झाली आहे. दुखापतग्रस्त टीम सेफर्टच्या ऐवजी ब्लंडेलची टीममध्ये निवड झाली आहे. टॉम लेथम हा न्यूझीलंडच्या टीममधला पहिल्या पसंतीचा विकेट कीपर आहे.

क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार न्यूझीलंडच्या निवड समितीने दुसरा स्पिनर म्हणून टॉड एस्टलच्याऐवजी ईश सोदीला संधी देण्यात आली, तर टीम सेफर्टच्या फिट होण्याची वाट पाहण्याऐवजी ब्लंडेलची निवड केली गेली.

२८ वर्षांच्या ब्लंडेलने दोन टेस्ट आणि तीन टी-२० मॅच खेळल्या आहेत, पण ब्लंडेलला एकही आंतरराष्ट्रीय वनडे मॅचचा अनुभव नाही. ब्लंडेलने स्थानिक वनडे क्रिकेटमध्ये ४० मॅचमध्ये २३.८१ च्या सरासरीने रन केले आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. डग ब्रेसवेलला न्यूझीलंडच्या टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडचा पहिला सामना श्रीलंकेशी एक जूनला होणार आहे. तर वर्ल्ड कपला ३० मेपासून सुरुवात होईल.

न्यूझीलंडची टीम

केन विलियमसन(कर्णधार), मार्टिन गप्टील, हेनरी निकोल्स, रॉस टेलर, टॉम लेथम, टॉम ब्लंडेल, कॉलीन मुन्रो, कॉलीन डि ग्रॅण्डहोम, जिमी निशम, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, लॉकी फरग्युसन, मॅट हेन्री, मिचेल सॅण्टनर, ईश सोदी