जयपूर : मंगळवारी राजस्थानविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये बंगळुरुचा ७ विकेटने पराभव झाला. या पराभवासोबतच बंगळुरुचा यापर्वातील हा सलग चौथा पराभव ठरला. या पराभवामुळे आता बंगळुरुवर आत्ताच प्ले ऑफच्या स्पर्धेतून बाद व्हायचं संकट ओढावू लागलं आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी बंगळुरुच्या टीमला पुढच्या जवळपास सगळ्याच मॅच जिंकाव्या लागणार आहेत. बंगळुरुच्या या कामगिरीवर त्यांचा बॉलिंग प्रशिक्षक आशिष नेहराने प्रतिक्रिया दिली आहे.
'हाती आलेली प्रत्येक लहान संधीचं योग्य फायदा घेतला तरच आपण जिंकतो. आता आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. आयपीएलमध्ये प्रत्येक टीम १४ मॅच खेळणार आहे. त्यातील ४ मॅच या खेळून झाल्या आहेत, त्यामुळे आता आपल्याकडे केवळ १० मॅच उरल्या आहेत. अटीतटीची मॅच जिंकल्यास बंगळुरुची टीम पुनरागमन करेल', असा विश्वास आशिष नेहराने व्यक्त केला.
यंदाच्या मोसमात बंगळुरु आतापर्यंत ४ मॅच खेळली आहे. यातल्या सगळ्या मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आयपीएलच्या सध्याच्या अंकतालिकेतील पहिल्या आणि शेवटच्या टीममध्ये फारसे अंतर नाही. सुरुवातीच्या मॅच हरल्यानंतर प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा करिश्मा मुंबईच्या टीमने याआधी केला आहे. आता बंगळुरुलाही अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे.