World Cup 2019 : क्रिकेटमध्ये नवा इतिहास, इंग्लंड 'सुपर' विश्वविजेता

लॉर्ड्सच्या ऐतिहासकि मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. 

Updated: Jul 15, 2019, 12:38 AM IST
World Cup 2019 : क्रिकेटमध्ये नवा इतिहास, इंग्लंड 'सुपर' विश्वविजेता title=

लंडन : लॉर्ड्सच्या ऐतिहासकि मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये इंग्लंडने वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे.  वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनल टाय झाली. एवढच नाही तर फायनल टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली, अखेर सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लडचा विजय झाला

सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी १६ रनचं आव्हान दिलं. पण न्यूझीलंडला १५ रनच करता आले.

न्यूझीलंडने ठेवलेल्या २४२ रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा २४१ रनवर ऑल आऊट झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला विजयासाठी १५ रनची गरज होती. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या दोन बॉलला बेन स्टोक्सला एकही रन काढता आली नाही. यानंतर स्टोक्सनं ट्रेन्ट बोल्टच्या तिसऱ्या बॉलला सिक्स मारली. चौथ्या बॉलला दोन रन काढल्यानंतर मार्टिन गप्टीलने केलेला थ्रो स्टोक्सला लागून बॉल फोरला गेला. यामुळे इंग्लंडला ६ रन मिळाल्या. पाचव्या बॉलला दुसरी रन काढताना आदिल रशीद रन आऊट झाला. यानंतर शेवटच्या बॉलवर इंग्लंडला विजयासाठी २ रनची गरज होती. तेव्हा दुसरी रन काढताना मार्क वूडही रन आऊट झाला.

संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला चांगली सुरुवात करुन देणाऱ्या जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोला या मॅचमध्ये चमक दाखवता आली नाही. इंग्लंडचा स्कोअर २८/१ असा असताना जेसन रॉय माघारी परतला. यानंतर इंग्लंडला धक्के लागत होते. पण बेन स्टोक्स आणि जॉस बटलरने इंग्लंडला पुन्हा खेळात आणलं. जॉस बटलरने ६० बॉलमध्ये ५९ रन केले, तर बेन स्टोक्स ८४ रनवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडकडून जिमी निशम आणि लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर मॅट हेन्री आणि कॉलिन डिग्रॅण्डहोमला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.

याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये २४१/८ एवढा स्कोअर केला. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरलेल्या मार्टिन गप्टीलला या मॅचमध्ये चांगली सुरुवात मिळाली, पण तो मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. गप्टील १९ रन करून आऊट झाला. तर गप्टीलबरोबर ओपनिंगला आलेला हेन्री निकल्स ५५ रन करून आऊट झाला.

गप्टीलची विकेट सुरुवातीला गेल्यानंतर निकल्स आणि कर्णधार केन विलियमसनने न्यूझीलंडचा डाव सावरायला सुरुवात केली. पण केन विलियमसन ३० रनवर माघारी परतला. टॉम लेथमने ५६ बॉलमध्ये ४७ रन करून न्यूझीलंडला २४० रनपर्यंत पोहोचवलं.

इंग्लंडकडून लियाम प्लंकेट आणि क्रिस वोक्सला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.