World Cup 2019 : अब्दुल रझाकने पातळी सोडली, मोहम्मद शमीचा धर्म काढला

 माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने पातळी सोडली 

Updated: Jul 2, 2019, 05:01 PM IST
World Cup 2019 : अब्दुल रझाकने पातळी सोडली, मोहम्मद शमीचा धर्म काढला title=

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा पहिला पराभव झाला. या पराभवाचा धक्का पाकिस्तानलाही बसला आहे. इंग्लंडच्या पराभवामुळे पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याचा मार्ग कठीण झाला आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स भारतीय खेळाडूंवर निशाणा साधत आहेत. पण या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने पातळी सोडली आहे. 

भारताने इंग्लंडविरुद्धची मॅच मुद्दाम हरल्याचं पाकिस्तानी माध्यमांमधले समिक्षक अप्रत्यक्षरित्या सांगत आहेत. क्रिकेटच्या या सगळ्या वादाला आता अब्दुल रझाकने हिंदू-मुस्लिम रंग दिला आहे. 

'भारताकडे चांगले बॉलर आहेत, पण बुमराह आणि चहलला चांगली बॉलिंग केल्यानंतरही विकेट मिळत नाहीयेत.

पण मोहम्मद शमी आपलं काम करत आहे. तो मुसलमान आहे ही चांगली गोष्ट आहे. जरी तो भारताकडून खेळत असला तरी,' असं वादग्रस्त वक्तव्य अब्दुल रझाकने केलं आहे. 

भुवनेश्वर कुमारला दुखापत झाल्यानंतर मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. शमीने मिळालेल्या या संधीचं सोनं केलं. या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ३ मॅचमध्ये शमीने एकूण १३ विकेट घेतल्या आहेत. यातल्या पहिल्या मॅचमध्ये शमीला ४ विकेट, दुसऱ्या मॅचमध्ये ४ विकेट आणि तिसऱ्या मॅचमध्ये ५ विकेट मिळाल्या. अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये तर शमीने हॅट्रिकही घेतली. 

वकार युनूसचे आरोप

टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वकार युनसने आरोप केले आहेत. 'तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही आयुष्यात काय करता यावरच तुम्ही कोण आहात ते कळतं. पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचेल का नाही, याची मला चिंता नाही. पण एक गोष्ट पक्की आहे. काही चॅम्पियन्सच्या खेळ भावनेची परीक्षा घेतली गेली, यामध्ये ते खराब पद्धतीने अपयशी ठरले,' असं ट्विट वकार युनूसने केलं.

अशाच पद्धतीने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनीही भारतावर आरोप केले. पाकिस्तानला वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्यासाठी भारत अशी रणनिती वापरू शकतो, असं सिकंदर बख्त म्हणाले.