बर्मिंघम : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला. या मॅचमध्ये विराटने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. केदार जाधवच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादवच्याजागी भुवनेश्वर कुमारचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.
बर्मिंघमची एका बाजूची बाऊंड्री फक्त ५९ मीटर असल्यामुळे एकच स्पिनर घेऊन खेळत असल्याचं विराटने सांगितलं. पण केदार जाधवला डच्चू देण्याचं कारण मात्र विराटने सांगितलं नाही. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध केलेल्या संथ खेळीमुळे केदारला वगळण्यात आल्याचं बोललं जातंय. पण केदारला वगळल्यामुळे दिनेश कार्तिकला पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळत आहे.
२००७ वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये दिनेश कार्तिकची निवड झाली होती, पण त्याला एकाही मॅचमध्ये खेळायची संधी मिळाली नाही. यानंतर २०११ आणि २०१५ वर्ल्ड कपमध्ये दिनेश कार्तिकला संधी मिळाली नाही. पण २०१९ वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये दिनेश कार्तिकची निवड झाली. आता दिनेश कार्तिकला पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली.
२००४ साली धोनीच्या आधीच दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण धोनीचा उदय आणि कामगिरीत सातत्य नसल्यामुळे दिनेश कार्तिकला संधी मिळाली नाही. दिनेश कार्तिक सध्याच्या भारतीय टीममध्ये सगळ्यात आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा खेळाडू आहे.
५ सप्टेंबर २००४ साली दिनेश कार्तिकने इंग्लंडविरुद्ध वनडेमध्ये पदार्पण केलं. तर ३ नोव्हेंबर २००४ साली कार्तिक ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली टेस्ट खेळला. कार्तिकने ९२ वनडेमध्ये ३१.०४ च्या सरासरीने १,७३८ रन केले आहेत. यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश आहे.