हे रेकॉर्ड करुन विराट स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट देणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा टी-२० सामना रंगतोय. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयाची हीच लय कायम राखत भारतीय संघ दुसऱ्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Updated: Nov 4, 2017, 04:23 PM IST
हे रेकॉर्ड करुन विराट स्वत:ला वाढदिवसाचे गिफ्ट देणार? title=

राजकोट : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा टी-२० सामना रंगतोय. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे विजयाची हीच लय कायम राखत भारतीय संघ दुसऱ्या मालिकेत विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

यजमान संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्यांना केवळ एका सामन्यात पराभवास सामोरे जावे लागले. पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या संघाला ना फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली ना गोलंदाजीत. या सामन्यात भारताने मात्र दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली. 

कर्णधार विराट कोहलीसाठी आजचा दुसरा टी-२० सामना महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकल्यास विराट केवळ मालिकाच जिंकणार नाही तर अनेक रेकॉर्डही मोडणार आहे. 

तसेच उद्या विराटचा वाढदिवस आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करत तो स्वत:लाच वाढदिवसाचे चांगले गिफ्ट देऊ शकतो. 

आजच्या सामन्यात विराटने १२ धावा केल्या तर तो श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशानला मागे टाकेल. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ५३ सामन्यांत १८७८ धावा केल्यात. दिलशानच्या खात्यात १८८९ धावा आहेत. त्यामुळे दिलशानचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला १२ धावांची आवश्यकता आहे. 

विराटने या सामन्यात १० धावा केल्या तर सर्व प्रकारच्या टी-२०मध्ये ७००० धावा पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईल. इतक्या धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरेल. विराटच्या खात्यात ६९९० धावा आहेत. टी-२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा क्रिकेटर ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १०५७१ धावा केल्यात. 

विराट कोहलीने आजच्या सामन्यात एक जरी चौकार ठोकला तरी त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये २०० चौकारांचा रेकॉर्ड होईल. २०० चौकार ठोकणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरेल. पाकिस्तानचा मोहम्मद शहजाद आणि श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान यांच्या नावावर २००हून अधिक चौकार आहेत. 

टी-२०मध्ये न्यूझीलंड नेहमीच भारतापेक्षा वरचढ राहिलाय. या मालिकेआधी भारताने एकदाही टी-२०मध्ये न्यूझीलंडला हरवले नव्हते. पहिल्या सामन्यात विजय मिळवत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने हा इतिहास रचलाच होता. मात्र आजचा सामना जिंकल्यास न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे.