मुंबई : हार्दिक पांड्या हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलच्या इतिहासात त्याचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. या वर्षी त्याला विशेष कामगिरी करता आली नसली तरी पुढील सीझनमध्ये त्याला इतर टीमकडून चांगली किंमत मिळू शकते.
हार्दिक पांड्याने आयपीएलच्या इतिहासात 92 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 27.33 च्या सरासरीने आणि 153.91 च्या स्ट्राइक रेटने 1476 रन्स केले आहेत. यादरम्यान हार्दिकने 4 अर्धशतकंही झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 91 होती. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्याने 31.26 च्या सरासरीने आणि 9.06 च्या इकॉनॉमी रेटने 42 विकेट्स घेतले.
मुंबईमध्ये पांड्या होणार नाही रिटेन
हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. कारण रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे कायम ठेवण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
या 5 टीम करू शकतात हार्दिकला रिटेन
आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु सर्व संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत हार्दिक पांड्या लिलावात जाण्यासाठी सज्ज झाला आहे. या अष्टपैलू खेळाडूला लक्ष्य करू शकतील अशा 5 संघांवर एक नजर टाकूया.
पंजाब किंग्ज 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. परंतु आतापर्यंत त्यांना एकही विजेतेपद मिळालेलं नाही. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीचे मालक संघात अशा काही खेळाडूंचा प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील जेणेकरुन ट्रॉफीवर कब्जा करता येईल. यामध्ये त्यांच्यासाठी हार्दिक पांड्या हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
दिल्ली कॅपिटल्सला कदाचित एकदाही आयपीएल चॅम्पियन बनता आले नसेल, पण या संघाने गेल्या 3 वर्षांपासून चांगली कामगिरी केली आहे. मेगा ऑक्शनपूर्वी बहुतांश बड्या खेळाडूंना सोडण्यात येणार आहे. आता संघाला पुन्हा मजबूत करण्यासाठी हार्दिक पांड्यासारख्या स्टार खेळाडूची गरज भासणार आहे.
विराट कोहलीचा संघ आरसीबी अजूनही पहिल्या आयपीएल विजयासाठी आसुसलेला आहे. अशा परिस्थितीत ही फ्रँचायझी मजबूत करण्यासाठी हार्दिक पांड्यासारख्या उत्कृष्ट खेळाडूची गरज भासेल. या संघाचे मालक अनेकदा बड्या खेळाडूंना टार्गेट करतात. त्यानुसार ते हार्दिकसाठी निश्चितच बोली लावू शकतील.
सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाची मालकी 5166 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. नवीन IPL संघांसाठी दुसरी सर्वोच्च बोली लावली. या संघाचे होम ग्राउंड नरेंद्र मोदी स्टेडियम असेल. हार्दिक पांड्या मूळचा गुजरातमधील वडोदरा शहराचा आहे. अशा परिस्थितीत, या फ्रँचायझीला त्याचा समावेश करून आपला चाहता वर्ग वाढवायचा आहे आणि त्याच वेळी तो संघाला बळकट करेल.
आरपी-एसजी ग्रुपने लखनऊची फ्रेंचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या कंपनीने आयपीएलच्या नवीन संघांसाठी सर्वात मोठी बोली लावली. या संघाचे होम ग्राउंड भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम असेल. संघाच्या मालकांच्या नजरा नक्कीच हार्दिक पांड्यावर असतील.