पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम

Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Record: पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असून भारताने नाबाद 80 धावांपर्यंत मजल मारली आहे. यशस्वीचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2023, 01:29 PM IST
पदार्पणाच्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम title=
रोहितबरोबर यशस्वीने डावाला संयमी सुरुवात केली आहे

Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी मैदानावर फलंदाजीला उतरलेल्या मुंबईकर यशस्वी जयस्वालने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या यशस्वीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. यशस्वीने या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच आपला सहकारी शुभमन गिलचाही विक्रम मोडीत काढला. कसोटीमध्ये पदार्पण करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यशस्वीने याबाबतीत सचिनलाही मागे टाकलं आहे. यशस्वीची सरासरी 80.21 इतकी आहे.

दमदार कामगिरी

यशस्वी जयस्वालला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेमध्ये भारताच्या कसोटी संघामधून पहिल्यांदाच स्थान देण्यात आलं आहे. कर्णधार रोहित शर्माच्या हस्ते सामन्याच्या सुरुवातील यशस्वीला कॅप देऊन त्याचं संघात स्वागत करण्यात आलं. यशस्वीचा राखीव खेळाडू म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023 साठीही निवड झाली होती. ऋतुराज गायकवाडने लग्नाच्या कारणामुळे निवड झाल्यानंतरही मालिकेमधून माघार घेतल्याने यशस्वीला संघात स्थान मिळालं. यशस्वीने घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत भारतीय संघात आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

या यादीत कोणाकोणाचा समावेश?

अगदी कमी वेळात यशस्वी मुंबईच्या रणजी संघात फलंदाज म्हणून स्थिरावला. एकूण 15 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 80.21 च्या सरसारीने 1845 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतकांचा समावेश आहे. विनोद कांबळी हा कसोटीमध्ये पदार्पण करताना सर्वाधिक सरासरी असलेला आघाडीचा खेळाडू आहे. त्यानंतर प्रवीण आम्रे आणि नंतर आता यशस्वी जयस्वालचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये आर. मोदी, सचिन तेंडुलकर आणि शुभमन गीलचा समावेश आहे. 

चांगल्या खेळीची अपेक्षा

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जयस्वाल 40 धावांवर खेळत आहे. त्याने 73 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या सहाय्याने या धावा केल्या. रोहित शर्मा 65 चेंडूंमध्ये 30 धावांवर खेळत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी खेळपट्टीवर स्थिरावले असल्याने त्यांच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीमुळे पहिल्याच दिवशी भारताला यजमान संघाला 150 धावांमध्ये रोखण्यात भारतीय संघाला यश आलं.

खेळाडूचे नाव - सरासरी - सामने
विनोद कांबळे - 88.37 - 27
प्रवीण आम्रे - 81.23 - 23
यशस्वी जयस्वाल - 80.21 - 15
आर. मोदी - 71.28 - 38
सचिन तेंडुलकर - 70.18 - 9
शुभमन गील - 68.78 - 23