Video: ...अन् सिराजने Superman प्रमाणे हवेत झेप घेत टिपला झेल; फलंदाजही पाहतच राहिला

IND vs WI 1st Test Mohammed Siraj Catch: मोहम्मद सिराजला या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये फारशी कमाल दाखवता आली नाही तरी त्याने पकडलेला हा झेल सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. या सामन्यामधील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचं झेल पाहूनच समजतं, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 13, 2023, 11:58 AM IST
Video: ...अन् सिराजने Superman प्रमाणे हवेत झेप घेत टिपला झेल; फलंदाजही पाहतच राहिला title=
सिराजने पकडलेला झेल चर्चेचा विषय ठरतोय

IND vs WI 1st Test Mohammed Siraj Catch: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान (IND vs WI Test) बुधवारपासून सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिलाच दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारतीय गोलदांजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघाला केवळ 150 धावांवर गुंडळण्यात यश आलं. अश्वीनने 32 व्या वेळा 5 गडी बाद करण्याचा पराक्रम केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने नाबाद 80 धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावामध्ये अश्विनच्या गोलंदाजाची चर्चा राहिली तरी दुसरीकडे मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) घेतलेला एक भन्नाट झेल सर्वाचं लक्ष वेधून घेणार ठरला. 

सुपरमॅनसारखी उडी घेत झेल

सामन्यामध्ये गोलंदाजी करताना सिराजला केवळ एकच विकेट घेता आली. मात्र त्याने जर्मेन ब्लॅकवूडचा झेल ज्या पद्धतीने घेतला ते पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली. जर्मेन ब्लॅकवूडने 14 धावांची खेळी केली. जर्मेन हा खेळपट्टीवर जम बसवणार असं वाटत असतानाच रविंद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीवर मोठा फटका मारल्याचा प्रयत्न केला. मात्र मिडऑफला मारलेला हा फटका हवेतून सीमारेषेकडे जाणार असं वाटत असतानाच मोहम्मद सिराजने धावत जाऊन हवेत सुपरमॅनसारखी उडी घेत एका हाताने चेंडू पकडला.

सर्वांकडूनच कौतुक

सिराजने अगदीच भन्नाट झेल घेतल्यानंतर भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष सुरु केला. हा झेल घेण्याच्या नादात सिराजला दुखापतही झाली. जर्मेन ब्लॅकवूड बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या डावाला गळतीच लागली. जर्मेन ब्लॅकवूडनंतर यजमान संघाचे अनेक फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. सिराजने घेतलेला झेल हा सामन्यातील पहिल्या दिवसाचा टर्निंग पॉइण्ट ठरला असंही काही चाहते म्हणत आहेत. सर्वच स्तरातून सिराजच्या या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. सुदैवाने हा झेल घेताना सिराज गंभीर जखमी झाला नाही.

अश्विनचा विक्रम

पहिल्या दिवशी 24.3 षटकांची गोलंदाजी करुन अश्विनने वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत पाठवला. तसेच रविंद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. त्याने 14 षटकांमध्ये 26 धावा देत 3 गड्यांना तंबूत पाठवलं. शार्दुल ठाकूर आणि सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. अश्विनने या सामन्यात 700 गडी बाद करण्याचा विक्रमही नोंदवला. 700 हून अधिक विकेट घेणार अश्विन हा अनिल कुंबळे (956) आणि हरभजन सिंग (711) या दोघांनंतरचा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.