WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: भारत आणि वेस्ट इंडीजदरम्यान सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता गयानामधील प्रोविडेन्स स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघासमोर वेस्ट इंडीज संघाचा टी-20 मालिकेत अवतार हा कठीण पेपर वाटावा असा आहे. भारत या मालिकेमध्ये 0-2 ने पिछाडीवर असल्याने आजचा सामना करो या मरो प्रकारचा असणार आहे. भारताचा आजच्या सामन्यात पराभव झाला तर भारत सामना आणि मालिकाही गमावेल. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यामध्ये भारतीय संघ निवडण्याचं कठीण आव्हान भारतीय संघ व्यवस्थापनासमोर असेल. जाणून घेऊयात कशी असू शकते आजच्या सामन्यातील टीम इंडिया...
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल हे दोघे भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. असं झाल्यास यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात असलेला ईशान किशन 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. यशस्वी आणि शुभमनची जोडी ही वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर तुटून पडू शकते. हे दोन्ही फलंदाज पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. दोघेही आपल्या दमदार खेळीच्या जोरावर सामन्याचं पारडं संघाच्या बाजूने वळवू शकतात.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर उपकर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करु शकतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने याच मालिकेत पदार्पण करणाऱ्या तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली आहे. तो याच क्रमांकावर फलंदाजीला येईल अशी शक्यता आहे. पाचव्या क्रमांकावर ईशान किशनला संधी मिळू शकते. यशस्वी जयसवालला संधी देण्यात आली तर संजू सॅमसनला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यांमध्ये संजूने अनुक्रमे 12 आणि 7 धावा केल्या आहेत. संजूने आपल्या मागील 5 टी-20 सामन्यांमध्ये 30, 15, 5, 12 आणि 7 धावा केल्या आहेत.
तिसऱ्या टी-20 सामन्यामध्ये वेस्ट इंडीजच्या संघाविरोधात अष्टपैलू खेळाडू म्हणून 6 व्या क्रमांकावर कर्णधार हार्दिक पंड्याच धुरा संभाळेल. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेलला संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. अक्षर हा फिरकी गोलंदाज आणि उत्तम फलंदाजही आहे.
फिरकी गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्याकडे असेल. चहल आणि चायनामॅन स्पिनर अशी ओळख असलेले कुलदीप या सामन्यात भारताचे हुकूमी एक्के ठरु शकतात. हार्दिक पंड्याने या दोघांना संधी दिली तर रवी बिश्नोईला बाहेर बसावं लागेल. बिश्नोईला दुसऱ्या टी-20 सामन्यात एकही विकेट घेता आली नाही.
वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार या दोघांना संधी दिली जाईल. उमरान मलिक आणि आवेश खान यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.