कोणत्या कारणाने रोहित शर्माला टीम इंडियातून वगळलं?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Jan 1, 2022, 10:08 AM IST
कोणत्या कारणाने रोहित शर्माला टीम इंडियातून वगळलं? title=

मुंबई : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांची वनडे सीरीज 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान या सीरीजसाठी केएल राहुल टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या सीरीजमध्ये रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही. 

भारताचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, आगामी महत्त्वाची मालिका आणि T20 वर्ल्डकप लक्षात घेऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्माला न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चेतन शर्मा म्हणाले, "या सीरीजच्या पुढे महत्त्वाच्या मालिका आहेत. या वर्षी टी-20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळेच रोहितने रिहॅबिलीटेशन सुरू ठेवलं असून तो फिटनेसवर काम करतोय. त्यामुळे या सीरीजमध्ये केएल राहुल कर्णधारपदाची धुरा सांभाळेल. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. विराट कोहलीचाही संघात समावेश करण्यात आला आहे."

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजसाठी 18 जणांच्या टीमची घोषणा केल्यानंतर चेतन शर्मा यांनी सांगितलं, “आजकाल बरंच क्रिकेट खेळलं जातंय. कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त होऊ इच्छित नाही. प्रत्येकाला खेळायचं आहे. आणि यामुळेच रोहितला या मालिकेत खेळण्यापासून रोखण्यात आलं आहे."

वनडे सीरीजसाठी टीम इंडिया

केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) , भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.