IND vs ENG Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा (Indian Squad for final three Tests Announced) झाली आहे. टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली संपूर्ण सिरीजमध्ये खेळणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलंय. तर टीम इंडियामध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचं कमबॅक झालंय. अशातच आकाश दीप या युवा खेळाडूला संघात स्थान देण्यात आलंय. मात्र, नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. त्यामुळे आता बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे. अशातच आता रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यांवर डाव लावलाय का? असा सवाल विचारला जातोय.
इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) उर्वरित तिन्ही सामन्यांमधून विराट कोहली बाहेर असणार आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोन्ही खेळाडूंचं इंग्लंडविरुद्धच्या संघात पुनरागमन झालंय. मात्र, तिसऱ्या कसोटीमध्ये दोन्ही खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही खेळाडूंना जोपर्यंत फिटनेस क्लियरन्स मिळत नाही, तोपर्यंत हे खेळाडू संघात खेळणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसरा आणि चौथ्या सामन्यात रोहितच्या अडचणी वाढणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
पुजारा-रहाणेला डच्चू...
चेतेश्वर पुजारा याने रणजी ट्रॉफीमध्ये बॅक टू बॅक शतक ठोकलंय. त्यामुळे त्याला संधी मिळेल का? असा सवाल विचारला जात होता. 35 वर्षीय पुजाराच्या पुनरागमनाची शक्यता फारच कमी दिसत होती. यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या निवडीमुळे टीम इंडिया आता पुजाराकडे बीसीसीआय पाठ फिरवेल, असं स्पष्ट दिसत होतं. तर दुसरीकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या रहाणेला संघात पुन्हा स्थान मिळालं नाही. उपकर्णधार ते टीम इंडियातून बाहेर असा परतीचा प्रवास रहाणेचा राहिलाय. आता टीम इंडियामध्ये रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यावर डाव लावला जात असल्याने रहाणेला पुन्हा संघाबाहेर रहावं लागतंय.
दिग्ग्जांना संधी का नाही? रोहित म्हणतो...
आम्ही सिनियर्स खेळाडूंना संघात आणण्याचा विचार केला होता, पण तरुण खेळाडूंना संधी कधी मिळणार? सिनियर्सना बाहेर ठेवणं सोपं नव्हतं, पण काही वेळा नवीन खेळाडूंना संधी द्यावी लागते ना... भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत. पुजारा आणि रहाणे हे महान खेळाडू आहेत. अनुकूल परिस्थितीनुसार तुम्हाला संघात बदल करावे लागतील, असं रोहित शर्माने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी म्हटलं होतं.
टीम इंडियाची स्क्वॉड
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.