मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगतोय. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमनेसामने येतात तेव्हा या सामन्याचा फिव्हर अधिकच असतो.
दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात पहिल्या ११ मध्ये कर्णधार विराट कोहली कोणाला स्थान देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दोनही सराव सामन्यात भारताने विजय मिळवलाय. त्यामुळे साहजिकच त्यांचा आत्मविश्वास उंचावलाय. मात्र यातच विराट आणि अनिल कुंबळे यांच्यात आलबेल नसल्याचे समोर आल्याने त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होऊ नये असे प्रत्येकाला वाटतेय.
भारताने खेळलेल्या दोनही सराव सामन्यात युवराज सिंग आजारी असल्याने खेळू शकला नव्हता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ११मध्ये त्याला स्थान दिले जाईल हा सवाल उपस्थित होतो.
अनिल कुंबळे यांच्या कडक नियमानुसार युवराजला ११मध्ये स्थान दिले जाईल का प्रश्न आहे. कारण एखादा क्रिकेटपटू गंभीर अथवा साधारण दुखापतीमुळे खेळू शकला नसल्यास त्याला भारतीय संघात खेळण्याआधी त्याला फॉर्म सिद्ध करावा लागेल.
दुसरीकडे बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी केली होती. त्याने ७७ चेंडूत ९४ धावांची खेळी केली होती. तसेच विकेटकिपींगही केले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात युवराजला संधी मिळणार की कार्तिकला हे उद्याच समजेल.