इस्लामाबाद : पाकिस्तनाच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इमरान खान पंतप्रधान बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पण इमरान खान यांची ओळख ही नेहमीच क्रिकेट कर्णधार म्हणून राहिली. मैदानामध्ये अशक्य असलेली गोष्ट इमरान खान यांनी शक्य करून दाखवली. पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून द्यायचं स्वप्न इमरान खाननी पूर्ण केलं. अजूनपर्यंत पाकिस्ताननं एकदाच विश्वचषक जिंकला आहे तोही इमरान खान यंच्याच नेतृत्वात. १९९२ सालचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी इमरान यांना राजकारणात यायची ऑफर दिली होती पण इमराननी ती ऑफर नाकारली. यानंतर १९९६ मध्ये इमरान यांनी स्वत:चा पक्ष बनवला.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ एक प्रथम श्रेणी मॅच आणि एक सराव सामनाही खेळले आहेत. १९८७ साली ही मॅच पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये झाली होती. या मॅचा उल्लेख इमरान खान यांनी त्यांचं पुस्तक पाकिस्तान अ पर्सनल हिस्ट्री मध्ये केला आहे.
१९८७ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप होणार होता. इंग्लंडसोडून दुसऱ्या देशात वर्ल्ड कप होण्याची ही पहिलीच वेळ होती. या वर्ल्ड कपआधी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये सराव सामना झाला. १९८७ मध्ये इमरान खान पाकिस्तानचे कर्णधार होते. पण या सराव सामन्यामध्ये पाकिस्तान टीमचं नेतृत्व करण्याचा निर्णय नवाज शरीफ यांनी घेतला. त्यावेळी नवाज शरीफ पाकिस्तानमधल्या पंजाबचे मुख्यमंत्री होते.
वेस्ट इंडिजविरुद्धचा सराव सामना लाहोरच्या गडाफी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार होता. या मॅचचे कर्णधार नवाज शरीफ असतील असं सांगण्यात आलं. नवाज शरीफ फक्त खेळाडू म्हणून येतील आणि मॅच बघतील असं आम्हाला वाटलं. पण ते मॅचचा ड्रेस घालून मैदानात आले आणि टॉससाठी गेले. त्यावेळी व्हिव्हियन रिचर्ड्स वेस्ट इंडिजचा कर्णधार होता.
या मॅचमध्ये नवाज शरीफ यांनी टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर शरीफ पॅव्हेलियनमध्ये आले आणि पॅड शोधायला लागले. पॅड बांधून शरीफ मुदस्सर नजरबरोबर ओपनिंगला बॅटिंगला गेले. त्यावेळची वेस्ट इंडिजची बॉलिंग भेदक होती. त्यामुळे नवाज शरीफ यांच्या बॅटिंगला जायच्या निर्णयानं आम्हाला धक्का बसला होता. मैदानाबाहेर अॅम्ब्यूलन्स तयार ठेवायला मी सांगितलं होतं, असं इमरान खान या पुस्तकात म्हणाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये नवाज शरीफ पहिल्याच बॉलला आऊट झाले होते. वेस्ट इंडिजच्या बॉलरचा पहिलाच बॉल एवढा जलद होता की नवाज शरीफ यांची बॅट खाली यायच्या आधीच ते बोल्ड झाले. ४ ऑक्टोबर १९८७ साली ही मॅच खेळवण्यात आली होती.
नवाज शरीफ हे क्लब क्रिकेटपटू होते. क्लब क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यामुळे त्यांना एक प्रथम श्रेणी मॅच खेळण्याचीही संधी मिळाली. १९७३-७४ साली नवाज शरीफ पाकिस्तान रेल्वेकडून पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सविरुद्ध मॅच खेळले. या मॅचमध्येही नवाज शरीफ शून्य रनवर आऊट झाले होते. यानंतर नवाज शरीफ कधीही प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले नाहीत. क्रिकेटनंतर नवाज शरीफ राजकारणात उतरले आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. सध्या शरीफ भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जेलमध्ये आहेत.