धोनीचे पाय अजूनही जमिनीवर!

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.

Updated: Jun 30, 2018, 03:11 PM IST
धोनीचे पाय अजूनही जमिनीवर! title=

मालाहाईड : आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.  या मॅचमध्ये भारतानं ४ बदल केले होते. हे बदल केले तरी भारतानं दुसरी टी-२० अगदी सहज जिंकली. आणि दोन टी-२०ची सीरिज २-०नं खिशात टाकली. दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा तब्बल १४३ रननी विजय झाला. पण या मॅचमध्ये सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं ते धोनीनं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढे रेकॉर्ड करूनही आपले पाय जमिनीवर आहेत, हे धोनीनं त्याच्या कृतीतून दाखवून दिलं.

काय केलं धोनीनं?

या मॅचमध्ये आयर्लंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि सुरेश रैना आयर्लंडच्या बॉलिंगचा धुव्वा उडवत होते. हवामान उष्ण असल्यामुळे या दोघांनाही पाण्याची गरज वाटली. त्यामुळे ओव्हरच्या मध्ये दोघांनीही पाण्याची आणि एनर्जी ड्रिंकची मागणी केली. यानंतर धोनी या दोघांसाठी पाणी आणि एनर्जी ड्रिंक घेऊन आला.

या मॅचमध्ये लोकेश राहुलनं सर्वाधिक ७० तर सुरेश रैनानं ६९ रन केल्या. पहिल्या मॅचमध्ये शून्य रनवर आऊट झालेला कोहली या मॅचमध्येही फक्त ९ रन करून आऊट झाला. हार्दिक पांड्यानं शेवटी येऊन ९ बॉलमध्ये ३२ रनची फटकेबाजी केल्यामुळे भारतानं २० ओव्हरमध्ये २१३/४ एवढा स्कोअर केला. पहिल्या मॅच प्रमाणेच दुसऱ्या मॅचमध्येही कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलनं आयर्लंडची बॅटिंग गुंडाळली. आणि आयर्लंडचा ७० रनवर ऑल आऊट झाला. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलनं या मॅचमध्ये प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. पहिल्या मॅचमध्ये कुलदीपनं ४ तर युझवेंद्र चहलनं ३ विकेट घेतल्या होत्या.

आता इंग्लंडविरुद्ध कठीण परीक्षा

आयर्लंडच्या सोप्या दौऱ्यानंतर आता भारताची खरी परीक्षा सुरु होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये ३ टी-२०, ३ वनडे आणि ५ टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.